दरभंगा (बिहार) येथील सरकारी आयुर्वेद रुग्णालयामध्ये प्रथमच कुंडली पाहून उपचार करणारा बाह्य रुग्ण विभाग चालू !

भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन अशा पद्धतीने होणे हे अभिनंदनीय आहे ! आता देशातील अन्य रुग्णालयांमध्येही असा विभाग चालू व्हावा ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

दरभंगा (बिहार) – येथील सरकारी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये रुग्णांची कुंडली पाहून त्यांच्यावर औषधोपचार करण्याचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) चालू करण्यात आला आहे. देशात ‘ज्योतिष चिकित्से’च्या आधारे चालवण्यात येणारा अशा प्रकारचा हा पहिलाच बाह्य रुग्ण विभाग आहे आणि तोही सरकारी रुग्णालयात चालवण्यात येत आहे,  हे विशेष म्हटले जात आहे. या रुग्णालयाच्या आवारात राशींच्या अनुसार औषधी वनस्पतींचे एक उद्यानही उभारण्यात आले आहे.

येथील प्राचार्य डॉ. दिनेश्‍वर प्रसाद यांनी सांगितले, ‘चिकित्सा ज्योतिष’ ही ज्योतिषशास्त्राची एक प्राचीन शाखा आहे. सूर्य, चंद्र आदी ग्रह अन् राशी यांच्यावर आधारित रुग्णांवर उपचार करणारी शाखा आहे. यामध्ये रुग्णांची कुंडली आणि हस्तरेषा पाहून उपचार केले जातात. प्राचीन काळात ही उपचार पद्धत लोकप्रिय होती; मात्र काळाच्या ओघात ती अडगळीत गेली; मात्र आता पुन्हा तिचा वापर केला जात आहे. असा वापर करणारे आमचे पहिले रुग्णालय आहे. येथे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचारासहित ज्योतिष चिकित्साही केली जात आहे.’