‘परात्पर गुरुदेव सतत समवेत आहेत आणि तेच कृती करवून घेत आहेत’, याविषयी दोन साधिकांना आलेल्या अनुभूती
१. आध्यात्मिक त्रास होत असतांना सौ. सत्याली देव यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले तुमच्या घरी येऊन तेच तुमच्या माध्यमातून सेवा करवून घेणार आहेत’, असा भाव ठेवण्यास सांगणे
‘सौ. सत्याली देव यांना साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा होती. आध्यात्मिक त्रासामुळे त्यांना काही सुचत नव्हते. सेवा करतांना त्यांना अडचणी येत होत्या. तेव्हा त्यांनी मला भ्रमणभाष करून त्यांची अडचण सांगितली. मी त्यांना सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले तुमच्या घरी येणार आहेत. तेच तुमच्या माध्यमातून सेवा करवून घेणार आहेत’, असा भाव ठेवून प्रयत्न करा.’’
२. सौ. सत्याली यांनी प्रार्थना केल्यावर त्यांना ‘परात्पर गुरु डॉक्टर घरी आले आहेत’, असे जाणवणे, त्यांनी गुरुदेवांची पाद्यपूजा करणे आणि त्यानंतर त्यांचा त्रास उणावून सेवा भावपूर्ण करता येणे
सकाळी ९.३० वाजता नामजपासाठी बसल्यावर सौ. सत्याली यांनी परात्पर गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केली. तेव्हा त्यांना ‘साक्षात् गुरुमाऊली घरी आली आहे’, असे जाणवले. त्यांनी परात्पर गुरुदेवांची मानस पाद्यपूजा केली. त्या वेळी त्यांचा भाव जागृत झाला. त्यानंतर त्यांचा त्रास उणावला आणि त्यांची सकारात्मकता वाढली. त्यांना सेवेविषयीची सूत्रे सुचू लागली. त्यांनी साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवाही भावपूर्ण केली.
३. ‘परात्पर गुरुदेव सौ. सत्याली यांच्या घरी गेले आहेत आणि त्यांनी परात्पर गुरुदेवांची पाद्यपूजा केली आहे’, असे दृश्य साधिकेला दिसून तिचा भाव जागृत होणे
नामजप झाल्यावर सकाळी १० वाजता मी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर प्रार्थना करत होते. तेव्हा मला ‘गुरुदेव देवघरात नाहीत’, असे जाणवले. तेव्हा मला पुढील प्रसंग आठवला, ‘एक दिवस रुक्मिणीला विठ्ठल दिसत नाही. ती विठ्ठलाला शोधते. तेव्हा ‘विठ्ठल त्याच्या भक्ताकडे गेला आहे’, असे तिला कळते.’ तेव्हा मला पुढील दृश्य दिसले, ‘विठ्ठलाप्रमाणे गुरुदेवही सौ. सत्याली यांच्याकडून सेवा करवून घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले आहेत. गुरुदेवांना बघून सौ. सत्यालीताईंना पुष्कळ आनंद झाला आहे. त्यांनी गुरुदेवांची पाद्यपूजा केली. त्यांना चंदनाचा टिळा लावला. सुंदर फुलांचा हार त्यांना अर्पण केला. परात्पर गुरुदेवांना नैवेद्य भरवल्यावर सौ. सत्यालीताईंचा भाव जागृत झाला.’ हे दृश्य बघून माझाही भाव जागृत झाला.
‘हे गुरुमाऊली, ‘तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या अनुभूती देऊन सतत आमच्या समवेत आहात आणि तुम्हीच आमच्याकडून प्रत्येक कृती करवून घेत आहात’, याची साक्ष दिलीत’, यासाठी तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– सौ. सुषमा चंदनखेडे, चंद्रपूर (३१.५.२०२०)
|