वाळूचा अवैध उपसा केल्याप्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा नोंद केला असून ४ जण कह्यात !
७६ लाखांचा मुद्देमाल शासनाधीन !
अवैधपणे वाळूची चोरी करणार्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा केली तरच या घटना थांबतील. – संपादक
शिरूर – स्वतःच्या आर्थिक लाभासाठी अप्रामाणिकपणे घोड नदी पात्रातील वाळूचा अवैध उपसा केल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने ७ जणांच्याविरोधात गुन्हा नोंद केला असून ४ जणांना कह्यात घेतले आहे. वाळूची चोरी करून महसूल विभागाची कोणतीही अनुमती न घेता अवैधपणे ही वाळू विक्रीसाठी मोशी येथील जागेत आणली होती.
या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी एम्.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. घटनेची माहिती मिळाली असता पोलिसांनी ७५ लाख रुपयांचे ४ ट्रक आणि १ लाख ५२ सहस्र रुपयांची वाळू असा ७६ लाख ५२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला आहे. एम्.आय.डी.सी. भोसरी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.