भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आणि जगातील भारत !
१. देशाच्या प्रगतीमध्ये ‘हार्ड पॉवर’ आणि ‘सॉफ्ट पॉवर’ यांचे असणारे महत्त्व !
कोणत्याही देशाला स्वतःची सुरक्षा सबळ ठेवायची असेल आणि प्रगती साध्य करायची असेल, तर राष्ट्रीय सर्वसमावेशक शक्तीचा वापर करावा लागतो. यात ‘हार्ड पॉवर’ आणि ‘सॉफ्ट पॉवर’ या दोन महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. देशाची सैन्य शक्ती, गुप्तचर यंत्रणा, तंत्रज्ञानाची क्षमता इत्यादींना ‘हार्ड पॉवर’ म्हटले जाते, तर देशाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती, सण-उत्सव, पर्यटन इत्यादी गोष्टींना देशाची ‘सॉफ्ट पॉवर’ म्हटले जाते. जर देशाची प्रगती करायची असेल आणि त्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर ‘हार्ड पॉवर’ आणि ‘सॉफ्ट पॉवर’ या दोन्हींची आवश्यकता असते.
२. ‘सॉफ्ट पॉवर’ आणि जागतिक स्तरावर असणारे दिवाळीचे महत्त्व !
दिवाळी भारतातच नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये साजरी झाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉन्सन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला संबोधित केले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बोलत असतांना ‘जणू भारतीय व्यक्ती किंवा नेतेच बोलत आहेत’, असे वाटत होते. दिवाळीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन आणि कॅनडा यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून जगाच्या दृष्टीने दिवाळी किती महत्त्वाची आहे ? हे स्पष्ट झाले. अमेरिकेच्या संसदेमध्ये ‘राष्ट्रीय सण’ म्हणून दिवाळीनिमित्त सुट्टी देण्यात यावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला.
Diwali is India’s ‘soft power’ #Diwali #Deepavali #SoftPower #Indiahttps://t.co/owWLv05OZt
— Organiser Weekly (@eOrganiser) November 4, 2021
३. ‘सॉफ्ट पॉवर’मुळे भारताला होणारे लाभ !
३ अ. जगभरात भारताची चांगली प्रतिमा निर्माण होणे : ‘सॉफ्ट पॉवर’मुळे जगभरात भारताची चांगली प्रतिमा निर्माण होते. जगातील लोकांना वाटते की, भारत हा चांगला देश आहे. चीन म्हणतो, त्याप्रमाणे भारत आक्रमक नाही, जगाला त्रास देत नाही आणि आतंकवादाचा प्रसारही करत नाही. भारताचे नागरिक जेव्हा विविध देशांमध्ये स्थायिक होण्यासाठी, रहाण्यासाठी किंवा अभ्यासासाठी जातात, तेव्हा ते त्या त्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावतात, हे सर्व जगालाच ठाऊक आहे.
३ आ. अन्य देशांत रहाणार्या भारतियांचा त्या देशाला पुष्कळ आधार असणे : जगातील विविध देशांमध्ये अनुमाने ३ कोटी भारतीय रहातात. त्या भारतियांचा त्या त्या देशांना मोठा आधार आहे. ही ‘सॉफ्ट पॉवर’ आहे. यामुळे भारताचे इतर राष्ट्रांशी चांगले संबंध वृद्धींगत होतात. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताला विविध देशांचे साहाय्य मिळते, उदा. संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेमध्ये चीनच्या विरोधानंतरही भारताची नियुक्ती झाली. संयुक्त राष्ट्राच्या विविध समित्यांमध्ये तेथील देशांची भारताला चांगली मते मिळतात. त्यांच्याशी भारताचे चांगले आर्थिक हितसंबंध निर्माण होतात. यामुळे ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून दिवाळी ही भारतासाठी एक मोठी संधी आहे.
४. पर्यटनाद्वारे भारताविषयीची ‘सॉफ्ट पॉवर’ वाढणे
काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातील कुशीनगर येथे एका आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. हे विमानतळ एका बौद्ध केंद्रासाठी उभारण्यात आले आहे. गौतम बुद्ध यांनी भारतात विविध ठिकाणी कार्य केले. जगभरातील जे बौद्ध देश आहेत, त्यांना भारतात सामील व्हायचे आहे.कुशीनगर येथे विमानतळ झाल्याने भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ वाढेल, तसेच पर्यटनवाढीसही साहाय्य होईल. भारतात आध्यात्मिक पर्यटन, ‘ॲडवेंचर’ पर्यटन आणि धार्मिक पर्यटन (उदा. अयोध्या) वाढत आहे. पर्यटन देशासाठी लाभदायक असून प्रदूषणविरहित आहे. पर्यटन वाढल्यास लोकांना लाभ होतो. हा ‘सॉफ्ट पॉवर’चा परिणाम आहे. भारतातील प्रेक्षणीय ठिकाणांमुळे पर्यटनाला चालना मिळून देशाची आर्थिक प्रगती होते.
(सौजन्य : BRIG HEMANT MAHAJAN,YSM-2)
५. चीनच्या विरोधातील आर्थिक लढाई जिंकण्यासाठी ‘ऑलआऊट’ युद्ध लढले पाहिजे !
नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या काळात भारतियांनी चिनी साहित्याची खरेदी करण्याचे टाळले. त्यामुळे चीनची ५० सहस्र कोटी रुपयांची हानी झाली आहे. हे भारताला मिळालेले मोठे यशच आहे; परंतु केवळ येथेच न थांबता ही लढाई अनेक वर्षे लढावी लागणार आहे. ‘भारतीय व्हा आणि भारतीय वस्तू खरेदी करा !’, ही आपली घोषणा असायला हवी. जे दुकानदार चिनी साहित्याची विक्री करतात, त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. ‘कॉर्पाेरेट’ क्षेत्रातील लोक अजूनही चिनी साहित्याची खरेदी करत असतील, तर त्यांच्यावरही सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. जोपर्यंत आम्ही चीनच्या विरोधात ‘ऑलआऊट’ (शेवटपर्यंत) युद्ध लढत नाही, तोपर्यंत आपण चीनच्या विरोधात जी आर्थिक लढाई लढत आहोत, ती जिंकायला साहाय्य मिळणार नाही.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
‘सॉफ्ट पॉवर’ म्हणजे काय ?वर्ष १९९० च्या सुमाराला अमेरिकेचे अभ्यासक जोसेफ नाय यांनी अमेरिकी सत्तेचा प्रभाव अल्प होत असल्याच्या विचारप्रवाहाला छेद देण्यासाठी ‘सॉफ्ट पॉवर’ची संकल्पना मांडली होती. आपल्याला अपेक्षित इप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही दबावाविना दुसर्याला आकर्षित करण्याची क्षमता, म्हणजेच ‘सॉफ्ट पॉवर’ होय. याचा वापर करणे आणि त्याची फळे मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. |