प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे काढण्याची सेवा करत असतांना मुंबई येथील साधक श्री. अरविंद परळकर यांना आलेल्या अनुभूती !
प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे काढण्याची सेवा करत असतांना मुंबई येथील साधक श्री. अरविंद परळकर यांना आलेल्या अनुभूती आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !
२८ नोव्हेंबर या दिवशीच्या अंकात सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव झाला. त्या निमित्ताने …
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे झोपाळ्यावरील छायाचित्र काढतांना श्री. परळकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे हा भाग आपण २८ नोव्हेंबर २०२१ या दिवशी पाहिला. आज लेखाचा अंतिम भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/531018.html
३. प.पू. भक्तराज महाराज यांचे झोपाळ्यावरील छायाचित्र काढणे
३ ए. ‘‘प.पू. भक्तराज महाराज यांना ही छायाचित्रे दाखवावी लागतील आणि त्यांना ती आवडली नाहीत, तर ते जे काय बोलतील, ते ऐकून घ्यावे लागेल’’, हे प.पू. डॉक्टरांचे बोलणे ऐकल्यावर निराश होणे : मी विचारले, ‘‘मग आता काय करायचे ?’’ प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आता काय (करणार), अशी संधी पुन्हा काही मिळणार नाही. मी चार दिवसांनी इंदूरला जाणार आहे. तेव्हा प.पू. बाबा मला छायाचित्रांविषयी विचारतीलच. त्या वेळी हीच छायाचित्रे मला दाखवावी लागतील आणि प.पू. बाबांना ती आवडली नाहीत, तर ते जे काय बोलतील, ते ऐकून घ्यावे लागेल.’’ मी निराश झालो. मग मी ती छायाचित्रे कुंदाताईंना (डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांना) दाखवली. मी काढलेली छायाचित्रे कुंदाताईंना दाखवली की, त्या नेहमी त्यांचे पुष्कळ कौतुक करायच्या. त्यामुळे मी त्यांना ही छायाचित्रे दाखवली. ती पाहिल्यावर सौ. कुंदाताई काहीच बोलल्या नाहीत. बहुतेक त्यांनाही ही छायाचित्रे आकर्षक वाटली नसावीत.
३ ऐ. प.पू. भक्तराज महाराज यांनी एका छायाचित्राची निवड करणे, त्यांनी निवडलेले छायाचित्र अप्रतिम दिसत असून त्यात चैतन्यही भरपूर असल्याचे जाणवणे आणि ‘हे छायाचित्र सगळ्यांना आवडले’, असे कळल्यावर पुष्कळ आश्चर्य वाटणे : साधारण आठ दिवसांनी प.पू. डॉक्टर इंदूरहून मुंबईला परतल्याचे कळल्यावर मी घाबरत घाबरतच त्यांना भेटायला गेलो. प.पू. डॉक्टरांनी त्यातील एक छायाचित्र मला दाखवले आणि म्हणाले, ‘‘प.पू. बाबांनी या छायाचित्राची निवड केली आहे. किती छान छायाचित्र आहे बघ आणि त्यात चैतन्यही पुष्कळ आहे. मी ते छायाचित्र पाहिले आणि मलाही ते अप्रतिम वाटले. त्या छायाचित्रात प.पू. बाबा पुष्कळ तेजस्वी दिसत होते. इतक्यात कुंदाताई तिथे आल्या आणि म्हणाल्या, ‘‘अरे, काय सुंदर फोटो काढला आहेस तू बाबांचा ! इंदूरलाही सगळ्यांना पुष्कळ आवडला.’’ मी प.पू. डॉक्टरांना विचारले, ‘‘डॉक्टर, हा काय प्रकार आहे. तुम्ही इंदूरला जाण्याआधी आपल्याला कुणालाही ही छायाचित्रे फारशी आवडली नव्हती आणि आता असे काय घडले ?’’
३ ओ. ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी निवड केलेल्या छायाचित्रात त्यांनी त्यांचे चैतन्य पूर्णपणे ओतल्याने ते चैतन्यमय झालेले असणे आणि अशा रितीने त्यांनी त्यांचा संकल्प पूर्ण केलेला आहे’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे : प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘ही छायाचित्रे प.पू. बाबांच्या हातात गेल्यावर त्यात प.पू. बाबांची शक्ती आली आहे. विशेष करून हे छायाचित्र, ज्याची प.पू. बाबांनी निवड केली आहे, त्यात तर प.पू. बाबांनी त्यांचे चैतन्य पूर्णपणे ओतले आहे. छायाचित्रे काढण्याआधी बाबा म्हणाले होते, ‘मी देहत्याग केल्यानंतर माझे भक्त माझे छायाचित्र बघून माझी आठवण काढतील. माझे भक्त हे छायाचित्र देव्हार्यात ठेवतील आणि त्याची पूजा करतील.’ हा प.पू. बाबांचा संकल्प होता आणि त्यानुसार त्यांनी त्यांना हवे तसे छायाचित्र काढून घेतले आणि त्यांचा संकल्प पूर्ण केला.’’
– श्री. अरविंद परळकर, मुंबई (२१.४.२०२०)
(समाप्त)
प.पू. बाबांच्या झोपाळ्यावर बसलेल्या स्थितीतील छायाचित्रामुळेच साधिकेची प्रकृती लवकर सुधारणे‘प.पू. डॉक्टर, प.पू. बाबांच्या छायाचित्रातील शक्ती आणि चैतन्य यांचे रहस्यच तुम्ही इथे उलगडले आहे. तुम्ही माझ्या आजारपणात माझ्यासाठी पाठवलेल्या छायाचित्रामुळेच माझी प्रकृती लवकर सुधारली, हे मला कळले. आधुनिक वैद्यांनाही त्याचे आश्चर्य वाटत होते. तुमच्या आणि प.पू. बाबांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता दाटून भावाश्रू आले. थोड्याबहुत फरकाने प्रत्येक साधकाची हीच अवस्था असणार आहे. यासाठी आम्हा सर्व साधकांची तुमच्या आणि प.पू. बाबांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – श्रीमती रजनी साळुंके (१०.८.२०२०) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |