ज्येष्ठ नागरिक, त्यांची स्थिती आणि उदासीन राज्यव्यवस्था !

‘महाराष्ट्रात आज १ कोटी ७ लाख ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील नागरिक) आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ज्येष्ठांपैकी ५३ टक्के महिला आणि ४७ टक्के पुरुष आहेत. ५० टक्के महिला विधवा आहेत. बहुतांश महिला निराधार, परावलंबी आणि गरीब आहेत. एकूण ज्येष्ठांपैकी ६६ टक्के गरीब आहेत. केवळ ९ टक्के ज्येष्ठांना निवृत्तीवेतन मिळते. ज्येष्ठांचे आयुर्मान बरेच वाढल्यामुळे उतारवयात रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, स्मृतीनाश आणि कर्करोग अशा दुर्धर रोगांचा त्यांना सामना करावा लागतो. एकत्र कुटुंबपद्धत मोडकळीस आल्याने १७ टक्के ज्येष्ठांना एकटे रहावे लागते. ३१ टक्के ज्येष्ठांचा घरात छळ होतो. मालमत्ता नावावर करण्यासाठी मुले अथवा नातेवाईक यांचा दबाव असतो. घराबाहेरही जावे लागते. या नागरिकांच्या आयुष्यात सुधारणा व्हावी; म्हणून ‘फेस्कॉम’ आणि ‘आयस्कॉन’ या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय अन् देशस्तरीय संघटना सतत गेली १५ वर्षे राज्यशासनाकडे निवेदने देऊन प्रयत्न करत आहेत. पाठपुरावा करत आहेत; पण त्यांच्या वाट्याला उपेक्षाच येत आहे. याचाच अर्थ असा की, शासन दरबारी दबावतंत्र निर्माण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ आणि सदस्य यांची संस्था मोठ्या प्रमाणात असली, तरी सद्यस्थितीत न्यून वाटते. यासाठी जुन्या संघांची सदस्य संख्या वाढवून अधिकाधिक महिला आणि पुरुष सदस्यांचे नवीन संघ निर्माण करणे आवश्यक आहे.
– प्राचार्य विश्वासराव भदाणे, धुळे

एकाकी असणार्‍या ज्येष्ठ नागरिकांचे वेळ घालवण्यासाठीचे उपक्रम !

‘संसाराचा घरगाडा चालवता चालवता आपण वयाची पन्नाशी कधी ओलांडली आणि काही जण पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर येऊन पोचले, याचीही जाणीव झाली नाही. आपली लेकरंबाळं मोठी होऊन आभाळाएवढे पंख लावून उडून गेलीत. त्यामुळे ‘आपण म्हातारपणी एकाकी पडलो कि काय ?’, असे वाटू लागले आहे. अशांसाठी पुढील उपक्रम राबवले जातात.

१. ओळखी-पाळखी वाढून नवीन मित्र मिळवणे.

२. जुन्या जाणत्या परिचित मंडळींच्या सहवासाने आठवणींना उजाळा देणे.

३. ज्येष्ठ मित्रांच्या सहवासात विरंगुळा आणि आनंद मिळवणे.

४. लहानमोठ्या सहली आणि वनभोजन यांद्वारे जीवनात उल्हास मिळवणे.

५. एकमेकांचे अनुभवाचे बोल, विचार यांचे आदान-प्रदान करणे.


हे पण वाचा : ज्येष्ठ नागरिकों की समस्याएं तथा उनके लिए आचरण में लाने हेतु आवश्यक सूत्र !


६. नव्या पिढीच्या विचारांशी मिळते जुळते घेऊन वृद्धापकाळातील समस्या आणि आवश्यकता यांची युवा पिढीकडून प्रतिपूर्ती करणे.

७. ज्येष्ठांमधील गायक, कथा-कथनकार, अभिनय दर्शक, विनोदी व्यक्ती यांच्या भेटी घेणे.

८. आधुनिक वैद्य आणि विचारवंत यांच्या प्रबोधनाने ज्ञानात भर घालणे.

९. सामाजिक बांधिलकी आणि योगदान याची स्वतःला जाणीव करून देणे.

१०. ज्येष्ठ निराधार बंधू-भगिनींना एकाकी जीवन जगण्याच्या दुःखापासून मुक्ती मिळवणे.

११. मानसन्मानाचा उत्सव म्हणून ज्येष्ठ नागरिक संघात वाढदिवस साजरे करणे.

१२. ‘चेंज ऑफ माईंड’, ‘चेंज ऑफ प्लेस’, ‘टुर्स’ आणि ‘हॅपी थॉट्स’ यांमुळे जीवनात उत्साह मिळवणे.

१३. जिल्हाभरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघ एकत्रित आल्याने संघटनशक्तीमध्ये वाढ करणे आणि त्यातून ज्येष्ठांच्या कल्याणकारी सवलती प्राप्त करून घेण्यासाठी शासनावर दबाव आणणे.

१४. आरोग्याची काळजी घेऊन वृद्धापकाळ सुखाने आणि आनंदाने कसा घालवावा, याची शिकवण ज्येष्ठ नागरिक संघातून घेणे.

वरील १४ सूत्रांमध्ये वर्णन केलेल्या गोष्टींपासून मिळणार्‍या लाभांच्या प्राप्तीसाठी अधिकाधिक ज्येष्ठ नागरिक संघांची निर्मिती करून ‘फेस्कॉम’ तथा ‘आयस्कॉन’च्या (ज्येष्ठ नागरिकांच्या राज्य आणि केंद्र स्तरावरील संघटना) उद्दिष्टांत सहकार्य करा.’

(सध्या ज्येष्ठ नागरिक असलेल्यांच्या लहानपणी त्यांच्यावर साधनेचे संस्कार झाले नाहीत आणि त्यांना धर्मशिक्षणही मिळाले नाही. त्यामुळे अनेकांवर एकटे रहाण्याची पाळी येते. या काळात एकटे राहून वेळ कसा घालवायचा, याचाच विचार अधिक रहातो. अशा वेळी ज्येष्ठ नागरिक संघासारख्या संस्था, संघटना त्यांना साहाय्य करतात. अशा संघाने सांगितलेली वरील १४ सूत्रे पहाता त्यामध्ये साधनेसाठीचा वेळ कुठेच दिसत नाही. अशांवर आधीपासूनच साधनेचे संस्कार झाले असते, तर त्यांना एकटे रहाण्याची वेळ अल्प ठरली असती. हिंदूंची स्थिती जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत साधनेविनाच असते, हे अधिक लक्षात येते. हिंदु राष्ट्रात अशी स्थिती नसेल ! – संकलक)

(साभार : मासिक ‘मनोहारी मनोयुवा’, जानेवारी-फेब्रुवारी २०१४)