चित्रपटगृहात पडद्यावर अभिनेते सलमान खान दिसताच चाहत्यांकडून फटाक्यांची जीवघेणी आतषबाजी !
|
अभिनेते सलमान खान यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी चित्रपटगृहांत ‘फटाके कोण फोडतात ?’, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तरीही पोलीस अशांवर धडक कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतात. पोलिसांच्या अशा बोटचेप्या भूमिकेमुळे समाजकंटकांचे फावते ! असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? – संपादक |
मालेगाव (जिल्हा नाशिक) – येथील सुभाष चित्रपटगृहात २७ नोव्हेंबर या दिवशी ‘अंतिम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात अभिनेते सलमान खान दिसताच त्यांच्या काही चाहत्यांनी थेट चित्रपटगृहातच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. गेल्या खान यांच्या चाहत्यांनी ९ मासांत दुसर्यांदा अशा प्रकारे उपद्रव केल्याने चित्रपटगृहांच्या मालकांना धास्ती वाटत आहे. या वेळी चाहत्यांनी चित्रपटगृहात हवेत उडणारे फटाके फोडल्याने प्रेक्षकांची धावपळ झाली. काही चाहत्यांनी शिट्या वाजवून आणि नाचून जल्लोष केला. चाहत्यांच्या या जीवघेण्या आतषबाजीचा उच्छाद साधारण ५ मिनिटे चालू होता. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती छावणीचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.
मालेगावमध्ये १० वर्षांतील २७ वी घटना !
चित्रपटगृहांत २७ वेळा उपद्रव होत असतांना पोलीस झोपले होते का ? पहिल्याच घटनेच्या वेळी जर पोलिसांनी उपद्रवींवर कठोर कारवाई केली असती, तर वारंवार असे कृत्य करण्याचे कुणाचे धाडस झाले नसते ! – संपादक
फेब्रुवारी २०२० मध्ये ‘सेंट्रल’ चित्रपटगृहात अभिनेते शाहरूख खान यांचा ‘करण अर्जुन’ हा हिंदी चित्रपट दाखवला जात असतांना अशाच प्रकारे फटाके फोडण्याचा प्रकार घडला होता. पूर्वी चित्रपटगृहात चिल्लर उधळली जात होती. गेल्या १० वर्षांत विविध चित्रपटगृहांत २७ वेळा फटाके फोडण्याचा प्रकार झाला आहे.