ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांच्या जन्मघराची डागडुजी तातडीने करावी !
हिंदु जनजागृती समितीची रत्नागिरी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !
रत्नागिरी, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी सिंहगर्जना करून भारतियांमधील स्वराज्यप्राप्तीची चेतना जागृत करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आदर्श सरकारने युवा पिढीपुढे ठेवायला हवा. त्यासाठी त्यांच्या आठवणींचे जतन आणि संवर्धन करायला हवे; मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या रत्नागिरी येथील जन्मस्थानाची दुरवस्था झाली आहे. या अमूल्य ठेव्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सरकारने लोकमान्य टिळक यांच्या या जन्मघराची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन्. पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
२५ नोव्हेंबर या दिवशी समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. बी.एन्. पाटील यांची भेट घेऊन याविषयीचे सविस्तर निवेदन सादर केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. देवेंद्र झापडेकर, टिळकप्रेमी श्री. शरदचंद्र रानडे, श्री शिवचरित्र कथाकार श्री. बारस्कर आणि सनातन संस्थेचे श्री. रमण पाध्ये उपस्थित होते.