मातृभाषा आणि मातृभूमी यांविषयीच्या अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यवतमाळ – माता, मातृभाषा आणि मातृभूमी या तिन्हींविषयी प्रत्येक नागरिकाने अभिमान बाळगला पाहिजे. त्यासाठी आवश्यक जाणिवा संवर्धित करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ते २५ नोव्हेंबर या दिवशी येथील ‘हिंदी प्रसारक मंडळ बेरार’च्या वतीने २४ व्या ‘जवाहरलाल दर्डा स्मृती समारंभा’निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अस्थिरोग आरोग्य शिबिराचा प्रारंभ आणि जवाहरलाल दर्डा इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीचे लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.
नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे स्पष्ट करून राज्यपाल म्हणाले की, मातृभाषेविषयी आस्था आणि अभिमान जोपासतांना तिच्याविषयीच्या जाणिवा वृद्धींगत होण्यासाठी कृतीशील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपल्या मूळ सांस्कृतिक परंपरांविषयी आपण आग्रही असले पाहिजे. या परंपरांशी असलेली बांधिलकी प्रत्येकाने कायम ठेवावी. आपल्या संस्कृतीत अनेक उदात्त परंपरा आहेत. त्यांचे पालन करतांना पूर्वजांचे कृतज्ञ स्मरण ठेवले, तरच समाज आणि देश यांचे सांस्कृतिक उत्थान होऊ शकेल. भारत जागतिक महासत्ता होण्यासाठी सर्वांनी संकल्प करायला हवा. भारत हा जगद्गुरु झाला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे.