प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे काढण्याची सेवा करत असतांना मुंबई येथील साधक श्री. अरविंद परळकर यांना आलेल्या अनुभूती !
आज सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव आहे. त्या निमित्ताने …
२७ नोव्हेंबर २०२१ या दिवशी आपण सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी श्री. अरविंद परळकर यांची झालेली प्रथम भेट आणि प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे काढण्याची सेवा करतांना श्री. परळकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/530719.html
३. प.पू. भक्तराज महाराज यांचे झोपाळ्यावर बसलेले छायाचित्र काढणे
३ अ. कांदळीला प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्याशी निवांतपणे बोलण्याची संधी मिळणे : १९९१ या वर्षी एकदा प.पू. बाबा कांदळीला आले होते आणि त्यांनी प.पू. डॉक्टरांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) भेटायला बोलावले होते. प.पू. डॉक्टरांच्या गाडीतून मला कांदळीला जाण्याची संधी मिळाली. कांदळीला जेव्हा कोणताही उत्सव नसेल आणि प.पू. बाबा कांदळीला आले असतील, तर तिथे फारशी गर्दी होत नसे. त्या वेळी प.पू. बाबांशी निवांतपणे बोलता येत असे.
३ आ. आजपर्यंत भक्तांनी प.पू. भक्तराज महाराज यांची काढलेली छायाचित्रे त्यांना न आवडणे आणि ‘भक्त त्यांच्या देव्हार्यात ठेवून पूजा करू शकतील’, असे छायाचित्र काढून घेण्याची इच्छा प.पू. भक्तराज महाराज यांनी व्यक्त करणे : सकाळची वेळ होती. प.पू. डॉक्टर आणि प.पू. बाबा बोलत होते अन् आम्ही त्यांच्याजवळ बसून ऐकत होतो. बोलता बोलता प.पू. बाबा म्हणाले, ‘‘डॉक्टर, आजपर्यंत माझ्या भक्तांनी माझी लक्षावधी छायाचित्रे काढली असतील; पण एकही छायाचित्र माझ्या मनासारखे आले नाही. मला एक असे एक छायाचित्र काढून घ्यायचे आहे, जे मी गेल्यानंतरसुद्धा माझ्या प्रत्येक भक्ताच्या घरात असेल आणि माझा प्रत्येक भक्त ते बघून माझी आठवण काढेल. माझे काही भक्त मला देव मानतात. ते हे छायाचित्र त्यांच्या देव्हार्यात ठेवतील आणि त्याची पूजा करतील.’’ प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘बाबा, मग आताच काढूया. हा काय छायाचित्रकार परळकर इथे आहेच आणि त्याने त्याचा छायाचित्रकही आणलाय.’’ प.पू. बाबाही लगेच ‘हो’ म्हणाले.
(आतापर्यंत प.पू. बाबांची लक्षावधी छायाचित्रे काढली गेली असतील, तरी पहिल्यांदाच प.पू. बाबा स्वतःहून म्हणत होते, ‘‘मला असे छायाचित्र काढून घ्यायचे आहे’’ आणि त्यासाठी आवश्यक ती ‘पोझ’ही ते देणार आहेत. हे छायाचित्र काढायची संधी मला मिळणार आहे’, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो.)
३ इ. छायाचित्रे काढण्याच्या सत्राची सिद्धता करत असतांना काही जणांनी प.पू. भक्तराज महाराज यांना अत्तर लावणे आणि तेव्हा ‘छायाचित्रात काही अत्तराचा सुगंध येणार नाही’, असा विनोद करण्यात येणे : प.पू. बाबांना छायाचित्र काढून घ्यायचे आहे आणि आता त्यांचा छायाचित्रे काढण्याचे सत्र (photo session) होणार आहे, हे आश्रमात सर्र्वांना लगेच समजले आणि भक्तांच्या उत्साहाला एकच उधाण आले. पूर्वसिद्धता चालू झाली. काही भक्तांनी प.पू. बाबांच्या तोंडवळ्याला पावडर लावली, डोक्याला तेल लावले आणि केस विंचरले. तेल लावून केस विंचरल्यावर ते एकदम चिप्प बसले होते, ते प.पू. बाबांना आवडले नाही; म्हणून त्यांनी केस पुन्हा थोडे विस्कटून ठेवले. प.पू. बाबांनी नवीन धोतर परिधान केले. परीट घडीचा पांढरा शुभ्र सदरा घातला. काही जणांनी (उत्साहापोटी) प.पू. बाबांना अत्तरही लावले. त्यावर ‘छायाचित्रात अत्तराचा सुगंध येणार नाही’, असा विनोदही करण्यात आला.
३ ई. ‘‘कांदळीच्या आश्रमात असलेला झोपाळा ही तुमची ‘ओळख’ आहे, तेव्हा या झोपाळ्यावर बसून छायाचित्र काढूया’’, हा प.पू. डॉक्टरांचा विचार प.पू. भक्तराज महाराज यांनी मान्य करणे आणि प.पू. महाराज झोपाळ्यावर जाऊन बसणे : नैसर्गिक सूर्यप्रकाशात छायाचित्र चांगले येईल; म्हणून प.पू. बाबा त्यांच्या खोलीतून बाहेर आले. कांदळीच्या आश्रमात असलेल्या झोपाळ्यावर केवळ प.पू. बाबाच बसत असत. तो प.पू. बाबांचा झोपाळा असल्याने भक्त कधीही त्यावर बसत नसत. प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘बाबा, हा झोपाळा ही तुमची ‘ओळख’ आहे. तेव्हा या झोपाळ्यावर बसून छायाचित्रे काढूया.’’ प.पू. बाबांनी ते मान्य केले आणि प.पू. बाबा झोपाळ्यावर जाऊन बसले.
३ उ. ‘झोपाळ्यावर बसलेल्या स्थितीत; पण निरनिराळ्या ‘पोझ’मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांची आठ ते दहा छायाचित्रे काढणे : थोड्या वेळाने प.पू. बाबा म्हणाले, ‘‘डॉक्टर, आतापर्यंत मी एवढी भजने लिहिली आहेत. मी गेल्यानंतर जर कुणी तुम्हाला विचारले की, ‘कशावरून ही भजने भक्तराज महाराजांनी लिहिली आहेत ? काय पुरावा आहे तुमच्याकडे ?’ तेव्हा ‘मी भजन लिहितोय’, असे छायाचित्र काढले, तर तुम्हाला खात्रीने (निश्चितपणे) पुराव्यानिशी सांगता येईल की, ही भजने प.पू. भक्तराज महाराजांनीच लिहिली आहेत.’’ यावर प.पू. डॉक्टर मिस्कीलसे हसले आणि लगेच वही अन् पेन आणून प.पू. बाबांकडे दिले. प.पू. बाबांनी ‘भजन लिहित आहे’, अशी पोझ दिली. काही जण प.पू. बाबांना थोडेसे हसायला सांगत होते. छायाचित्रकार म्हणून मी बाबांना ‘जरा उजव्या बाजूला – जरा डाव्या बाजूला, मान थोडी वर – खाली’, अशा सूचना देत होतो आणि प.पू. बाबा त्याप्रमाणे करत होते. झोपाळ्यावर निरनिराळ्या ‘पोझ’मध्ये (अवस्थेत) बसलेल्या स्थितीत मी प.पू. बाबांची ८ ते १० छायाचित्रे काढली.
३ ऊ. प.पू. भक्तराज महाराजांनी स्वतःहून छायाचित्रे काढायची इच्छा प्रदर्शित करूनही त्या मानाने छायाचित्रे तेवढी चांगली आलेली नसल्याने समाधान न मिळणे आणि प.पू. डॉक्टरांनीही ती चांगली आली नसल्याचे सांगणे : मुंबईस परतल्यावर मी छायाचित्रकातील ‘फिल्मचा रोल’ धुवायला दिला. छायाचित्रे मिळाल्यावर मी ती पाहिली. जरी छायाचित्रे चांगली होती, तरी प.पू. बाबांनी स्वतःहून छायाचित्रे काढायची इच्छा प्रदर्शित केली, एवढा सगळा थाटमाट झाला, त्यामानाने ती छायाचित्रे तितकीशी आकर्षक नव्हती. माझेच समाधान झाले नाही. मी छायाचित्रे घेऊन प.पू. डॉक्टरांना दाखवायला त्यांच्या घरी गेलो. छायाचित्रे पाहिल्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘परळकर, छायाचित्रे पाहिजे तेवढी चांगली आली नाहीत. प.पू. बाबांनी तुला दिलेली ही एक सुवर्णसंधी होती. तू त्याचे सोने करायला हवे होतेस.’’
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– श्री. अरविंद परळकर, मुंबई (२१.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |