कोकणी चित्रपट निर्मितीसाठी संपूर्ण सहकार्य असेल ! – सुभाष फळदेसाई, अध्यक्ष, मनोरंजन संस्था
पणजी – कोकणी चित्रपट निर्मितीसाठी मनोरंजन संस्था सर्वतोपरी सहकार्य करील, असे आश्वासन मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिले आहे. चित्रपट महोत्सवात २५ नोव्हेंबरला ‘डिकोस्ता हाऊस’ या चित्रपटाचा ‘प्रिमियर शो’ झाला. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाल्याने मला पुष्कळ आनंद होत आहे, असे या चित्रपटाचे निर्माते डॉ. प्रमोद साळगावकर यांनी सांगितले. कोकणी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग मोठा नाही. त्यामुळे कोकणी चित्रपट निर्माण करणे परवडत नाही, तरीही गोव्यातील चित्रपट निर्मात्यांनी कोकणी चित्रपट बनवला. ‘डिकोस्ता हाऊस’ या चित्रपटात गोमंतकीय कलाकार असून चित्रपटाचे चित्रीकरणही गोव्यातच झाले आहे. हा चित्रपट सर्वांनी पहाणे आवश्यक आहे, असे मत मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले. कोकणी आणि इतर चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे मनोरंजन संस्थेचे धोरण आहे. सर्व चित्रपटांना आर्थिक साहाय्य योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले. महोत्सवात गोव्यातून दिग्दर्शक ब्रिजेश काकोडकर यांचा ‘गगन’, हिमांशू सिंह यांचा ‘कृपाचो दर्यो’ आणि ‘पॉल टेल’ हे कोकणी चित्रपट, तर वर्धन कामत यांचा ‘लिमिट्स’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.