नाशिक जिल्ह्यात सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’त सहभागी होण्याचे केले आवाहन !
नाशिक – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी जिल्ह्यातील विविध मान्यवर आणि धर्माभिमानी यांच्या भेटी घेऊन हिंदु जनजागृती समितीचे कार्य आणि सनातनचे ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियान’ यांविषयी माहिती दिली.
‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’ला साहाय्य करू ! – हेमंत (अप्पा) गोडसे, खासदार, शिवसेना
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यास नेहमी साहाय्य करणारे शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत (अप्पा) गोडसे यांची भेट घ्यायला गेल्यावर श्री. सुनील घनवट यांचे त्यांनी स्वागत केले. त्यांना ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’च्या संदर्भात माहिती देण्यात आली, तेव्हा त्यांनी त्वरित ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’ला खासदार निधीतून साहाय्य करू’, असे सांगितले. त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यकारिणीत विषय मांडून ग्रंथांची मागणी देऊ ! – श्रीमती नीलिमाताई पवार, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था
नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी आणि ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’ची माहिती देण्यात आली. ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’ला प्रतिसाद देत ‘येत्या कार्यकरिणीच्या बैठकीत विषय मांडू आणि ग्रंथांची मागणी देऊ’ असे त्यांनी सांगितले. श्रीमती नीलिमाताई पवार यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.
उपाहारगृहात धर्मशिक्षण फलक लावू ! – चिंतामणी अकोलकर, मालक, हॉटेल वेदान्त, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर येथील ‘हॉटेल वेदान्त’चे मालक श्री. चिंतामणी अकोलकर यांची श्री. घनवट यांनी भेट घेतली. त्यांनी सनातनच्या ‘धर्मशिक्षण फलक’ या ग्रंथाच्या १ सहस्र तमिळ भाषेतील प्रतींची मागणी देणार असल्याचे, तसेच उपाहारगृहात (हॉटेल) धर्मशिक्षण फलक लावणार असल्याचे सांगितले.
आमदार निधीतून अवश्य साहाय्य करू ! – डॉ. राहुल आहेर, आमदार, भाजप
भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांची भेट घेतली. या वेळी समितीच्या कार्याविषयी आणि ज्ञानशक्ति प्रसार अभियानाच्या संदर्भात त्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी ‘आमदार निधीतून ज्ञानशक्ति प्रसार अभियानाला निश्चित साहाय्य करू’ असे या वेळी सांगितले.
अन्य मान्यवरांचा प्रतिसाद !
१. येथील जिल्हा निधी नियोजन मुख्य अधिकारी श्री. किरण जोशी यांची श्री. घनवट यांनी भेट घेतली. त्यांनीही हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतले. श्री. जोशी यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.
२. येथील ‘टी.व्ही. ९’ या वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार चंदन पूजाधिकारी यांच्याशी श्री. घनवट यांची विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली. वाहिनीकडून राष्ट्र आणि धर्म कार्यात कसे साहाय्य होऊ शकते, याविषयी श्री. पूजाधिकारी यांनी जाणून घेतले.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्य पुष्कळ चांगले आहे ! – सौ. हिमगौरी आडके-आहेर, नगरसेविका, भाजपभाजपच्या नगरसेविका सौ. हिमगौरी आडके-आहेर यांची ज्ञानशक्ति प्रसार अभियानाच्या संदर्भात श्री. घनवट यांनी भेट घेतली. त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांविषयी जाणून घेतले. ‘तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे; मी अवश्य साहाय्य करीन’ असे त्या म्हणाल्या, तसेच त्यांच्या ग्रंथालयासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील सनातनच्या सर्व ग्रंथांच्या संचांची मागणीही त्यांनी दिली. |