सातारा नगरपालिकेला मिळालेला पुरस्कार ‘मॅनेज’ केलेला !
नगरसेवक अमोल मोहिते यांचा आरोप
सातारा, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – सातारा नगरपालिकेमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘नगर विकास आघाडी’ची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे सध्या पालिकेत मनमानी कारभार चालू आहे. कचर्याविषयी कोट्यवधी रुपये व्यय करून उभारण्यात आलेल्या ‘बायोमायनिंग’ प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याविषयी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. तरी सातारा नगरपालिकेला केंद्र सरकारचा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार मिळाला आहे, हे सातारावासियांचे भाग्यच म्हणावे लागेल. समस्त सातारावासियांना सातारा किती स्वच्छ आहे, हे माहिती असून सातारा नगरपालिकेला मिळालेला पुरस्कार हा ‘मॅनेज’ केलेला (पैसे देऊन जुळवून आणलेला) पुरस्कार आहे, अशी घणाघाती टीका सातारा विकास आघाडीचे नगरसेवक अमोल मोहिते यांनी केली आहे.
अमोल मोहिते पुढे म्हणाले की, गत २ मासांपासून पालिकेची एकही सभा झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम १९६५ च्या कलम ८१ अ नुसार ४५ दिवसांच्या आत नियमित सभा घेण्याचा कायदा आहे; मात्र सातारा नगरपालिकेने या कायद्याचा भंग केला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.