वाहन अडवून मारहाण करून मोठ्या चोरीच्या आरोपाखाली ३ गोरक्षकांवर गुन्हा नोंद; एकाला अटक !
गोरक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचा गोरक्षकांचा आरोप
|
नंदुरबार – वाहन अडवून मारहाण करून मोठी चोरी केल्याच्या आरोपाखाली नंदुरबार तालुका पोलिसांनी २५ नोव्हेंबर या दिवशी गोरक्षकांवर गुन्हा नोंद केला असून एकाला अटक केली आहे. ‘नंदुरबार शहरात एकही अधिकृत पशूवधगृह चालू नसतांना कातडी आणि हाडे येथून बाहेरगावी कशी पुरवली जातात ? गोवंशियांची कातडी, हाडे आणि शिंगे वाहून नेणारी वाहने अन् व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्याचा आग्रह धरला म्हणूनच गोरक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. अवैधपणे गोवंशाची कत्तल करणार्यांना संरक्षण दिले जात आहे’, असा आरोप गोरक्षकांच्या वतीने केतन रघुवंशी यांनी केला आहे. (याविषयी पोलिसांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)
१. २४ नोव्हेंबर या दिवशी दुपारी गोवंशियांची कातडी भरलेले पिकअप वाहन नंदुरबारहून दोंडाईचाच्या दिशेने जात होते. एका ठिकाणी वाहन उलटल्याने गोवंशियांची कातडी आणि अन्य अवशेष रस्त्यावर पसरले. तेव्हा वाहनातील लोक आणि गोरक्षक यांच्यात वाद झाला.
२. ‘नंदुरबार शहरात अवैध कत्तल करून अशा प्रकारे अवैध कातडी वाहून नेणार्यांवर कारवाई करावी’, अशी मागणी करत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात जाऊन गोरक्षकांनी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. तालुका पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांनी ‘निश्चिती केल्यानंतर गुन्हा नोंद करू’, असे सांगितले.
३. २५ नोव्हेंबर या दिवशी पोलिसांनी कातडीसह वाहन सोडून दिल्याचे गोरक्षकांना समजल्यावर त्यांनी संतप्त होऊन पोलिसांकडे कारवाईचा आग्रह धरला. साहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी ‘कातडी, वाहतुकीची, तसेच वाहनाची योग्य कागदपत्रे बोलेरोचालक जहांगीर शेख अहमद कुरेशी याने उपलब्ध करून दिल्यामुळे गुन्हा नोंद होऊ शकत नाही’, असे स्पष्ट केले. यावरून गोरक्षक संतप्त झाले. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी गोरक्षकांची समजूत काढायचा प्रयत्न केला.
४. ‘नंदुरबार येथे कोणतेही अधिकृत पशूवधगृह नसतांना एवढी कातडी नंदुरबारमध्ये येते कुठून ?’, असा प्रश्न करून ‘कातडीसह वाहन कह्यात घेण्यात यावे आणि सखोल चौकशी करण्यात यावी’, अशी ठाम भूमिका गोरक्षकांनी घेतली. अतिरिक्त अधीक्षक पवार म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाचा आदेश लक्षात घेता कातडी आणि हाडे वाहून नेण्याला बंधन घालून तपासता येत नाही. संबंधित व्यापारी भाग्यनगर येथून घाऊक दराने कातडी आणून किरकोळ स्वरूपात येथे विकत असतो. तसे अधिकृत कागदपत्र त्याने सादर केल्याने त्याच्यावर कारवाई होणार नाही.’’ या वेळी विजय पवार यांनी गोरक्षकांना उद्देशून अवमानकारक भाषा वापरली, असा गोरक्षकांचा आरोप आहे.
५. २५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी बोलेरोचालक जहांगीर शेख अहमद कुरेशी, अब्दुल रज्जाक पार्क यांची तक्रार प्रविष्ट करून घेण्यात आली, तर गोरक्षक भूषण पाटील, नरेंद्र पाटील आणि अन्य एक अशा तीन जणांविरोधात मोठ्या चोरीची कलमे लावून गुन्हा नोंदवण्यात आला.
६. जहांगीर शेख अहमद कुरेशी याने तक्रारीत म्हटले, ‘‘२४ नोव्हेंबर या दिवशी बोलेरो गाडीतून मेलेल्या जनावरांची कातडी वाहून नेत असतांना भूषण पाटील, नरेंद्र पाटील यांनी आपसांत संगनमत करून वाहनाचा पाठलाग केला. आरोपींनी दमदाटी करून शिवीगाळ केली, तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करून रोख रक्कम ९ सहस्र रुपये बळजोरीने काढून घेण्यात आले.’’