महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीच महिलांवर अत्याचार करणारे आहेत ! – भाजपच्या नेत्या नीता केळकर
सोलापूर – महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यात महिला आणि युवती असुरक्षित आहेत. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी त्वरित भेटी देऊन सावित्रीच्या लेकींना पाठबळ देणे, गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारने पुढे येणे अपेक्षित असते; मात्र मुख्यमंत्री यासाठी घराबाहेर पडत नसून महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री युवती आणि महिला यांवर अत्याचार करणारे आहेत. त्यामुळे सावित्रीच्या लेकी राज्यात सुरक्षित नाहीत, अशी टीका भाजपच्या नेत्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमुख नीता केळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
महाविकास आघाडी सरकारच्या २ वर्षांच्या कार्यकाळात राज्यात महिला आणि युवती यांवर वाढलेल्या अत्याचारांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती केळकर बोलत होत्या. हॉटेल ऐश्वर्या येथे झालेल्या पत्रकार परिषदेस सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
(सौजन्य : Livesolapur News LSN Marathi News)
या वेळी केळकर पुढे म्हणाल्या की,
१. महाबळेश्वर येथे एका पर्यटक महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली. मुंबई, पुणे, बीड येथे महिलांवर सामूहिक अत्याचार झाले. पुण्यात एका बालिकेवर अत्याचार झाला. बार्शी तालुक्यात एका महिला अधिकार्यावर चालकाने अत्याचाराचा प्रयत्न केला होता, अशा अनेक घटना घडूनही राज्य सरकारने त्या विरोधात कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.
२. एका युवतीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी भाजपने लावून धरली होती. त्यानंतर त्यांची हकालपट्टी झाली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. त्या महिलेच्या मुलांना स्वत:चे नाव देण्याची सिद्धता मुंडे यांनी दाखवली आहे. नियम आणि कायदा यांचे उल्लंघन करणार्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रीमंडळात न्यायमंत्री म्हणून ठेवले आहे. राज्यातील मंत्रीच महिलांवर अत्याचार करत असतील, तर ते गुन्हेगारांवर कशी कारवाई करणार ?