हॉर्लिक्सच्या विज्ञापनामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम
एकीकडे हॉर्लिक्समध्ये नैसर्गिक खाद्यपदार्थांमधील तत्त्वे असल्याचा दावा, तर दुसरीकडे हॉर्लिक्स हा त्यांना पर्याय नसल्याचे सांगत आस्थापनाची सारवासारव !
अशा विज्ञापनांमुळे ग्राहकांमध्ये निर्माण होणारा संभ्रम रोखण्यासाठी सरकारने निश्चित धोरण सिद्ध करून त्याची कठोर कारवाई केली पाहिजे ! ग्राहकांनीही याविषयी जागरूक होऊन ग्राहक संरक्षण कक्षाकडे तक्रार केली पाहिजे ! – संपादक
मुंबई, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘हॉर्लिक्स’ या शक्तीवर्धक पेयाचे विज्ञापन वर्तमानपत्रांतून मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. यामध्ये २ कप ‘हॉर्लिक्स’मध्ये ३ ग्लास दुधाएवढे ‘कॅल्शिअम’, २ वाट्या पालकभाजीएवढे लोह आणि एका संत्र्याएवढे जीवनसत्त्व ‘क’ मिळते, असा दावा करून ‘हॉर्लिक्स’ हे दूध, भाज्या अन् फळे यांना पर्याय असल्याचे ठळकपणे दाखवण्यात आले आहे. याच विज्ञापनामध्ये खाली अत्यंत लहान अक्षरांत ‘नैसर्गिक किंवा सामान्यपणे घेतल्या जाणार्या खाद्यपदार्थांना ‘हॉर्लिक्स’ हे पर्याय नाही’, असे लिहून सारवासारव करण्यात आली आहे. यातून विज्ञापनातील चित्रे आणि लिखाण यांमध्ये विसंगती आहे, हे लक्षात येते. त्यामुळे या विज्ञापनातून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
हॉर्लिक्सप्रमाणेच अनेक उत्पादनांच्या विज्ञापनांत ठळक अक्षरांत त्या उत्पादनाचे महत्त्व पटवून दिलेले असते आणि त्याच्याच खाली सहजपणे वाचता येणार नाही, एवढ्या लहान अक्षरांमध्ये दाव्याचे दायित्व घ्यायला संबंधित आस्थापन सिद्ध नसते. अशी विज्ञापने मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रे, फलक (साईन बोर्ड), दूरचित्रवाणी यांवरून प्रसारित केली जात आहेत. ही विज्ञापने पाहून ग्राहक उत्पादन विकत घेतात. यातून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. यातून त्यांची फसवणूक होत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.