भारतमाता आणि हिंदु देवता यांची विकृत चित्रे काढणार्या म.फि. हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात ठेवू नयेत !
हिंदु जनजागृती समितीकडून मुंबईतील ‘एअर इंडिया’च्या आस्थापनाला निवेदन
मुंबई, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – भारतमातेचे नग्न चित्र, तसेच हिंदूंच्या देवतांची कामुक आणि विकृत चित्रे रेखाटणारे चित्रकार म.फि. हुसेन यांची चित्रे प्रदर्शनामध्ये ठेवू नयेत, अशी विनंती हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एअर इंडिया’ या विमान आस्थापनाच्या मुंबईतील कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. एअर इंडियाच्या मुंबईतील कार्यालयात काही प्रख्यात चित्रकारांची चित्रे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये म.फि. हुसेन यांनी काढलेल्या चित्रांचाही समावेश आहे. याची माहिती मिळताच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर या दिवशी समितीचे श्री. प्रसाद मानकर आणि श्री. मंजुनाथ पुजारी यांनी ‘एअर इंडिया’च्या सुरक्षा विभागाचे प्रमुख किशोर प्रभु यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वरील विनंती केली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी आतंकवाद्यांनी मुंबईत केलेल्या आक्रमणानंतर म.फि. हुसेन यांनी ‘रेप ऑफ इंडिया’, असे विकृत चित्र सिद्ध केले. भारतमाता आणि हिंदूंच्या देवता यांची विकृत चित्रे काढल्यामुळे भारतभरात त्यांच्या विरोधात १ सहस्र २०० हून अधिक तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या. ४ ठिकाणी गुन्हाही नोंदवण्यात आला होता.
२. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी हुसेन भारत सोडून कतार देशात पळून गेले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी काढलेल्या विकृत चित्रांमुळे राष्ट्रप्रेमी नागरिक, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
३. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे केरळ शासनाकडून त्यांना घोषित करण्यात आलेला ‘राजा रवि वर्मा पुरस्कार’, तसेच ‘रूपधर जीवनगौरव पुरस्कार’ आणि दुबई येथे देण्यात येणारा ‘भोरूका ट्रस्ट’चा पुरस्कार रहित करण्यात आला होता. सिंगापूर येथील ‘एबीएन् एम्रो बँके’च्या ‘क्रेडिट कार्ड’वर असलेले हुसेन यांचे चित्र काढण्यात आले, तसेच देशभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेली त्यांच्या चित्रांची १५ हून अधिक प्रदर्शनेही रहित करण्यात आली.
Hypocrisy of M.F. Hussain
♦ Please read/watch this also – M.F. Hussain’s Controversial Paintings
♦ Recent Protests : https://www.hindujagruti.org/hjs-activities/stop-adharma-practices/mfhussain-campaign/recent-protests
४. हुसेन यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे, म्हणजे एक प्रकारे त्यांच्या कृत्याचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येऊ नये. तरीही हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात लावल्यास त्या विरोधात आंदोलन करावे लागेल; मात्र तशी वेळ येणार नाही. आपले सहकार्य मिळेल, अशी आपणाकडून अपेक्षा आहे.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)