भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा नाश करण्यासाठी धर्मश्रद्धेचा उपयोग करण्याची इच्छाशक्ती हवी !
१. ‘भ्रष्टाचार हा भारताचा सगळ्यांत मोठा रोग आहे’, असे सर्वपक्षीय प्रतिनिधींनी संसदेत मान्य करणे !
‘स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या संसदेची एक विशेष बैठक झाली. त्या विशेष बैठकीत राष्ट्रपतींपासून ते लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, माजी पंतप्रधान, संसदेतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या सर्वांनी एक गोष्ट वारंवार सांगितली. तसेच निरनिराळ्या पक्षांच्या प्रतिनिधींनी एकजात मान्य केले, ‘भ्रष्टाचार हा आपल्या देशातील सगळ्यांत मोठा प्रश्न आहे; सगळ्यात मोठा रोग आहे.’ अपवाद थोडासा तत्कालीन माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या भाषणाचा होता. त्यांच्या मते आपल्या देशातील केवळ पाच टक्के व्यवहार आणि लोक भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत अन् आपण या प्रकाराचा प्रमाणाबाहेर बाऊ करत आहोत. चंद्रशेखर यांचे हे म्हणणे कुणालाही पटले नाही.
२. भ्रष्टाचाराला सर्व स्तरांतील लोकांची मूकसंमती असल्यामुळे तो शिष्टाचार झालेला असणे
पुष्कळदा लोक म्हणतात, ‘‘तो पैसे खातो, ते खाऊ दे. त्याने आपले काम केले पाहिजे.’’ या उद्गारात भ्रष्टाचाराला मान्यताच मिळाली आहे. मुलगी देतांना तिचे आई-वडील सांगतात, ‘आमच्या जावयाचे वेतन बरे आहे. तसेच त्याचे वरचे उत्पन्नही चांगले आहे.’ वरच्या उत्पन्नाला म्हणजे भ्रष्टाचारातून मिळणार्या लाचेला ‘चांगुलपणाचे’ प्रशस्तीपत्रक मिळालेच आहे. पुष्कळसे नामवंत आधुनिक वैद्य (डॉक्टर्स) उघड उघड ठरलेल्या शुल्काखेरीज अधिक पैसा पटलाखालून (टेबलाखालून) घेतात, हे जगजाहीर आहे. सध्याचे अधिवक्ता तर स्पष्टच सांगतात, ‘गुन्हा सिद्ध झाल्याविना कुणालाही भ्रष्टाचारी म्हणता येत नाही.’ कायद्याच्या दृष्टीने ते खरेही आहे. कायदाच असा सिद्ध करावा की, गुन्हा सिद्ध होण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात यावी, म्हणजे उरली सुरली भीतीही रहाणार नाही. व्यापारी तर चक्क म्हणतातच, ‘व्यापारात सर्व काही चालते.’ विनोबा भावे यांच्या शब्दांत सांगायचे तर भ्रष्टाचार हा आता शिष्टाचार झालेला आहे. पैसे घ्यावेत आणि ते सर्व वरच्या खालच्या सहकार्यांत योग्य त्या प्रमाणात वाटावेत. मुख्य म्हणजे ‘आपण पकडले जाऊ नये’, असे धोरण आता अधिकाधिक रूढ होत चालले आहे.
३. आर्य चाणक्य यांनी अधिकार्यांच्या भ्रष्टाचाराविषयी अर्थशास्त्रात नोंदवलेले मत
‘पाण्यातला मासा पाणी केव्हा पितो’, हे जसे आपल्याला दिसत नाही, तसेच अधिकारी पदावर असलेले लोक अधिकाराचा कसा लाभ घेतात, म्हणजे भ्रष्टाचार कसा करतात, हे आपल्याला (सहजासहजी) दिसत नाही’, असे मार्मिक निरीक्षण आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्रात नोंदवले आहे.
४. भ्रष्टाचार करण्यामध्ये मध्यमवर्ग अधिक दोषी असणे
भ्रष्टाचार केवळ राजकारणी लोकच करतात, हा भ्रम आहे. मूल्यांच्या बाता मारणारा मध्यमवर्गही तेवढाच किंबहुना अधिक दोषी आहे. शासकीय आणि अशासकीय व्यवहारात त्याचेच संख्यात्मक अन् गुणात्मक प्राबल्य असते.
५. पुद्दुचेरीचा तत्कालीन फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याने ‘भारतियांना सहज विकत घेता येते’, अशा स्पष्ट शब्दांत देशवासियांविषयी लिहून ठेवले होते.
६. सदाचाराला धर्मनिष्ठा आणि पंथनिष्ठा यांची जोड मिळाल्यास भ्रष्टाचाराचे उच्चाटन शक्य !
याउलट धर्मनिष्ठा आणि पंथनिष्ठा सदाचाराला साहाय्य करते, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. उत्तरेत ‘बिष्णोई’ नावाचा पंथ आपल्या अनुयायांना सदाचार आणि साधी रहाणी यांचे विशिष्ट धडे देतो आणि त्यांच्याकडून त्याप्रमाणे वर्तन केले जाते. वारकर्यांनी एकदा तुळशीची माळ घातली की, ते काही गोष्टी कटाक्षाने निषिद्ध आणि त्याज्य मानतात. (स्व.) प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या ‘स्वाध्याय परिवारा’चे लक्षावधी अनुयायी काही पथ्ये आणि संकेत जाणीवपूर्वक पाळतात.
अशा परिस्थितीत धर्मश्रद्धेचा उपयोग भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि त्याच्या उच्चाटनासाठी होऊ शकतो. अर्थात् तसे करावयाची इच्छा असेल, तर ते साध्य होऊ शकते, अन्यथा विपरीत अर्थाने ‘अवघे धरू सुपंथ’ अशी भूमिका घेऊन भ्रष्टाचार सर्वमान्य करायचे आपण ठरवले, तर बोलणेच खुंटले.’
(भारतात फोफावत असलेल्या भ्रष्टाचाराचा भस्मासुर नष्ट करण्यासाठी जनतेला धर्मशिक्षण द्यायला हवे, तसेच भ्रष्टाचार्यांना कठोर शिक्षा ठोठावून त्याची प्रभावी कार्यवाही व्हायला हवी. ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ होण्यासाठी देशात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे अपरिहार्य आहे ! – संपादक)
– के.ज. पुरोहित
(साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, दीपावली विशेषांक १९९७)