महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त ! – वासुदेव काळे, प्रदेशाध्यक्ष, किसान मोर्चा
सांगली, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – अतीवृष्टीग्रस्तांना, तसेच वादळग्रस्तांना अल्प साहाय्य देऊन शेतकर्यांच्या जखमांवर मीठ चोळणार्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीविषयीही शेतकर्यांची फसवणूक केली. पीक विमा आस्थापनांना लाभदायक अशा अटी बनवून हानीभरपाई मिळण्यापासून शेतकर्यांना वंचित ठेवले. त्यामुळे नैसर्गिक संकटांमुळे खचलेल्या शेतकर्यांना साहाय्याचा हात मिळण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी २४ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला.
वासुदेव काळे पुढे म्हणाले, ‘‘सरकारने गेल्या २ वर्षांत राज्यातील अतीवृष्टी, महापूर, चक्रीवादळ यांचा फटका बसलेल्या शेतकर्यांना किरकोळ साहाय्य करत शेतकर्यांची क्रूर चेष्टा केली आहे. संपूर्ण मराठवाड्यात, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र याच्या काही भागांत अतीवृष्टीमुळे ५० लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली. त्याचसमवेत सहस्रो हेक्टर भूमी खरवडून निघाली, जनावरे वाहून गेली, घरे पडली; मात्र सरकारी पातळीवर शेतकर्यांच्या या हानीचा विचारही केला गेला नाही.’’ या वेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सरचिटणीस केदार खाडिलकर, डॉ. भालचंद्र साठ्ये उपस्थित होते.