परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणारे नागपूर येथील श्री. श्रीकांत क्षीरसागर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणारे अन् परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असणारे नागपूर येथील श्री. श्रीकांत क्षीरसागर (वय ७२ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
नागपूर जिल्ह्यातील साधकांसाठी २१ नोव्हेंबर २०२१ या दिवशी सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांच्या ‘ऑनलाईन’ मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पू. पात्रीकरकाकांनी सनातनचे साधक श्री. श्रीकांत क्षीरसागर (वय ७२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली. या वेळी पू. अशोक पात्रीकर यांनी श्री. श्रीकांत क्षीरसागर यांना श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला.
असे उलगडले आध्यात्मिक पातळीचे गुपित !
श्री. श्रीकांत क्षीरसागर यांची कन्या आणि रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. अंजली क्षीरसागर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या एकत्रित छायाचित्राचे, तसेच दशविद्या यंत्राच्या प्रतिमेचे आपत्काळाच्या दृष्टीने असणारे महत्त्व सर्वांना सांगितले आणि त्याविषयी साधकांचे शंकानिरसनही केले. या वेळी साधकांचा कृतज्ञताभाव जागृत झाला.
त्यानंतर पू. पात्रीकरकाकांनी उपस्थित साधकांना त्यांनी आतापर्यंत केलेले साधनेचे प्रयत्न आणि स्वतःत झालेले पालट यांविषयी सांगण्यास सांगितले. या वेळी श्री. श्रीकांत क्षीरसागर यांनीही त्यांचे अनुभव सांगितले. ‘ते पुष्कळ तळमळीने कृतज्ञताभावात राहून सांगत आहेत’, असे सर्वांनाच जाणवत होते. कोरोना काळात अनुभवलेली प्रतिकूल परिस्थिती, स्वतःला झालेली कोरोनाची लागण, बिकट आर्थिक परिस्थिती, तसेच कौटुंबिक अडचणी अशा अनेक कठीण प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले; मात्र परात्पर गुरुदेवांवरील अढळ श्रद्धेने काकांनी सर्व प्रसंगांना आनंदाने तोंड दिले. त्यांचे मनोगत ऐकून साधकांचा भाव जागृत झाला. यानंतर पू. पात्रीकरकाकांनी श्री. क्षीरसागरकाकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता दिली. या वेळी पुन्हा सर्व साधकांचा भाव जागृत होऊन गुरुकृपेने अमूल्य भेट मिळाल्याचा आनंद सर्वांना झाला.
संत नामदेव महाराज यांचा अभंग म्हणून त्याचे भावपूर्ण विवेचन सांगणारे आणि त्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांप्रतीची अंतरातील कृतज्ञता व्यक्त करणारे श्री. श्रीकांत क्षीरसागर !
श्री. श्रीकांत क्षीरसागर काकांची पातळी घोषित झाल्यावर ते मनोगत सांगत असतांना मनाने पुष्कळ स्थिर आणि शांत असल्याचे जाणवत होते. त्यांच्या प्रत्येक शब्दातून परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होत होती. काकांनी संत नामदेव महाराज यांचा ‘सद्गुरुसारिखा सोयरा जिवलग ।’ हा अभंग अर्थासहित म्हणून दाखवला. ‘आपला जिवलग, सोयरा केवळ गुरुच आहे, अन्य कुणीही नाही. सर्वजण काही काळापुरते आपल्या समवेत आलेले आहेत आणि नंतर ते आपल्याला सोडून जाणार आहेत. ज्यांना आपली काळजी वाटते, असे केवळ गुरुच आहेत. आपण गुरूंचे उतराई कधीच होऊ शकत नाही’, असे त्या अभंगाचे काकांनी भावपूर्ण विवेचन केले.
बाबांचे साधनेचे दृष्टीकोन अतिशय प्रगल्भ असून त्यांनी मला मायेतील विचारांपेक्षा साधनेलाच प्राधान्य देण्यास सांगितले ! – कु. अंजली क्षीरसागर (श्री. श्रीकांत क्षीरसागर यांची कन्या, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)
आम्ही सर्वजण या क्षणाची (वडिलांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होण्याची) आतुरतेने वाट बघत होतो. बाबा अतिशय झोकून देऊन सेवा करतात. बाबांचे साधनेचे दृष्टीकोन अतिशय प्रगल्भ आहेत. कौटुंबिक अडचणींमुळे मध्यंतरी मी त्यांना मी ‘नोकरी करू का ?’, असे विचारले, तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘तू आश्रमात इतकी वर्षे आहेस, तर साधनेलाच प्राधान्य दे.’’ मला साधनेत काही अडचणी आल्यास ते मला संतांचे मार्गदर्शन घेण्याविषयी सुचवात.
श्री. श्रीकांत क्षीरसागर यांची नागपूर येथील साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
इतरांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असलेले श्री. श्रीकांत क्षीरसागर (वय ७२ वर्षे) यांची नागपूर येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. नम्रता विनय शास्त्री, नागपूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)
१. सनातन संस्थेशी संपर्क
‘वर्ष १९९९ मध्ये श्री. श्रीकांतकाका यांना गणेशोत्सवात सनातन संस्थेचे एक हस्तपत्रक मिळाले. त्यामध्ये कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व सांगितले होते. ‘त्यांना ते पुष्कळ पटले आणि ही संस्था कोठे आहे ?’, याचा ते शोध घेऊ लागले. नंतर त्यांच्या लक्षात आले, ‘राजहंस कुटुंबीय (६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे श्री. धनंजय राजहंस आणि त्यांचे कुटुंबीय) हे कार्य करतात.’ त्यांच्या घरापासून राजहंस यांचे घर पुष्कळ दूर होते, तरी ते तेथे गेले. त्यानंतर ते आठवड्यातून तीन-चार दिवस श्री. राजहंसकाकांकडे जाऊ लागले. ‘ते रहात असलेल्या ठिकाणी सत्संग चालू आहे’, असे कळल्यावर ते आणि श्री. क्षीरसागर यांचे पूर्ण कुटुंब सत्संगाला जाऊ लागले अन् त्यांनी सेवेला आरंभ केला.
२. परात्पर गुरुदेवांच्या जाहीर सभेनंतर सेवा करण्यास आरंभ करणे
प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या स्तरावरून बघण्याची त्यांची सवय होती. त्यामुळे त्यांचा भाव आणि श्रद्धा न्यून पडत असे. पूर्वी परात्पर गुरुदेव जाहीर सभा घ्यायचे. ती सभा ऐकण्यासाठी काका गेले होते. तेव्हा त्यांच्या मनावर परम पूज्यांचा एवढा ठसा उमटला की, त्यांनी दायित्व घेऊन सेवा करण्यास प्रारंभ केला.
३. इतरांना साहाय्य करणे
दोन वर्षे नागपूर जिल्ह्यात संस्थेचे समष्टी कार्य होत नव्हते. त्या वेळी महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात वृत्त संकलनासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहार येणार होते. गुरुकृपेने निवासासाठी एक सदनिका (फ्लॅट) अर्पण मिळाली होती. त्या सदनिकेच्या सेवेचे दायित्व एक साधिका पहात होती. सदनिका स्वच्छतेसाठी कोणी साधक उपलब्ध नसल्याने तिला वाटले, ‘मी एकटीने स्वच्छता कशी करणार ?’ शेवटी तिने क्षीरसागरकाकांना सांगितले, ‘‘कोणीच सेवेला यायला सिद्ध नाहीत. आता कसे करू ?’’ तेव्हा काका म्हणाले, ‘‘काळजी करू नका. मी सेवेला येतो.’’ ती साधिका, क्षीरसागरकाका आणि अन्य एक साधिका सेवेला गेले अन् तिघांनी मिळून स्वच्छता पूर्ण केली. क्षीरसागरकाकांना अशा शारीरिक कष्टांची सवय नाही, तरी त्यांनी प्रार्थना करून सेवा केली.
४. स्वीकारण्याची वृत्ती
नागपूरमध्ये वयस्कर साधक अधिक आहेत. जे थोडे तरुण साधक-साधिका आहेत त्यांना दायित्व घेण्यात अडचणी येतात. एकच सेवा दोन-तीन साधकांमध्ये विभागून करून घ्यावी लागते. हे आरंभीला क्षीरसागर काकांना कठीण वाटत होते; पण नंतर त्यांनी ते स्वीकारले आणि आता त्यांना ‘गुरुदेवच सेवा करवून घेतात अन् मार्गही सुचवतात’, असे वाटते. याविषयी त्यांच्या मनात कृतज्ञताभाव वाढायला आरंभ झाला आहे. त्यांची ‘गुरुदेव पाठीशी आहेत, कर्ता-करविता तेच आहेत’, अशी श्रद्धा वाढीला लागली आहे.
५. परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणे
काका प्रत्येक प्रसंगाचा कार्यकारणभाव गुरुदेवांशी जोडायला लागले आहेत. पूर्वी त्यांचा केवळ परिपूर्ण सेवा करण्याकडे कल असायचा. आता त्यांचा कल भावपूर्ण सेवा करण्याकडे वाढला आहे. ते वयस्कर आहेत; पण तरीही ते सर्व सेवा शांतपणे आणि दायित्व घेऊन करतात. ते सेवेतील सर्व सूत्रांचा व्यवस्थित अभ्यास करतात आणि नेमकेपणाने सर्वांना सूत्रे समजावून सांगतात.
६. कठीण प्रसंगातही गुरूंवर श्रद्धा ठेवून स्थिर रहाणे
मागील दोन वर्षांपासून काही अडचणींमुळे काकांना काळजी वाटून पुष्कळ ताण यायचा. त्यामुळे त्यांना जेवणही जात नव्हते. रात्री झोपही यायची नाही आणि अस्थिरता जाणवायची. नंतर त्यांनी काळजी करणे सोडून दिले आणि स्वतःच्या साधनेकडे लक्ष द्यायला प्रारंभ केला. त्यामुळे त्यांना शांत आणि स्थिर रहाता यायला लागले. त्यांच्या मनात ‘माझी साधना काहीच होत नाही, तरी गुरुदेव माझी किती काळजी घेतात’, अशी दृढ श्रद्धा निर्माण झाली आहे. तेव्हापासून त्यांना रात्रीची शांत झोप यायला लागली. एवढ्या कठीण काळातही गुरूंनी त्यांना काहीही न्यून पडू दिले नाही. ‘हे केवळ गुरुकृपेनेच शक्य आहे’, अशी त्यांची ठाम श्रद्धा आहे. ‘माझ्या साधना काळातील ही सर्वांत मोठी अनुभूती आहे’, असे ते सांगतात. आता त्यांच्या मनात क्षणोक्षणी गुरूंप्रती कृतज्ञताभाव दाटून येतो आणि डोळ्यांतून भावाश्रू येतात.’
सौ. वैशाली महेश परांजपे, नागपूर
१. अपेक्षा उणावून इतरांना समजून घ्यायला जमणे
‘काकांची नोकरी लेखाच्या संदर्भातीलच असल्याने काकांना त्या सेवेतील बारकावे ठाऊक आहेत. आधी काकांना ‘साधकांकडून योग्यच सेवा व्हायला हवी’, अशी अपेक्षा असायची; परंतु आता ते साधकांना ‘हे विषय नवीन असल्यामुळे त्यांना कळण्यास अडचण येऊ शकते’, असे समजून घेतात आणि त्यांना मनापासून अन् न रागवता कितीही वेळा सेवा समजावून सांगतात. त्यांच्याकडून सेवा समजून घेतांना साधकांना ताण येत नाही. साधकांना सेवा समजावून सांगतांना त्यांच्यात ‘मला समजते’, असा अहंही जाणवत नाही.
२. सेवेची तळमळ
आम्ही गुरुपौर्णिमेच्या विज्ञापनाची (जाहिरातींची) सेवा एकत्रित करतो. तेव्हा काका स्वतःचे वय विसरून सेवेत उत्साहाने सहभागी होतात. सेवा करतांना त्यांचे तहान-भूक यांकडेही लक्ष नसते. आपण स्वतःहून काकांना काही विचारले, तरी ते म्हणतात, ‘‘मला जराही थकवा जाणवत नाही. आपण सेवा आजच पूर्ण करूया.’’ त्यांचे ‘झोकून देऊन सेवा करणे’ आणि ‘परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास’ हे गुण आत्मसात करण्यासारखे आहेत. त्यांच्या बोलण्यातून ‘गुरुकृपेने मला ही सेवा मिळाली आहे’, याविषयी कृतज्ञता जाणवते.
(सर्व सूत्रांचा दिनांक २५.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |