संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी निद्रानाशावर गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे
६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी निद्रानाशावर गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे
ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
‘श्री. प्रदीप चिटणीस यांनी निद्रानाश दूर करण्यासाठी भारतीय शास्त्रीय संगीतातील दरबारी कानडा, जोग आणि मालकंस हे ३ राग गायले. यांतील प्रत्येक रागाचा निद्रानाशावर परिणाम होतोच; पण हे तिन्ही राग येथे दिलेल्या क्रमाने ऐकल्याने त्यांचा एकत्रित परिणाम आणखी चांगला होतो. हे राग निद्रानाश दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/530220.html
१. राग दरबारी कानडा
१ अ. दरबारी कानडा राग आरंभ होतांना माझी चंद्रनाडी कार्यरत होती.
१ आ. दरबारी कानडा राग ‘अंगाईगीतासारखा’ शांत वाटणे : या रागाचे गायन संथ होते. ते ‘अंगाईगीतासारखे’ वाटले. या रागातील बहुतांश स्वर मंद्र आणि मध्यम सप्तकातील आहेत. त्यामुळे हा राग शांत आणि हळुवार वाटतो.
१ इ. दरबारी कानडा राग अनाहतचक्राशी संबंधित असल्याचे जाणवून त्यातील खर्जातील (मंद्र सप्तकातील) स्वरांमुळे छातीत हलकेपणा जाणवणे आणि मन शांत होणे : दरबारी कानडा राग अनाहतचक्राशी संबंधित जाणवला. मला अनाहतचक्रावर स्पंदने जाणवू लागली. तेथे त्या स्पंदनांचे कार्य होऊन मला छातीत हलकेपणा जाणवू लागला. माझे मन शांत झाले. खर्जातील (मंद्र सप्तकातील) स्वर तो
परिणाम साधतात.
१ ई. रागातील स्पंदनांचा प्रवास अनाहतचक्राच्या वरच्या दिशेने होऊ लागल्याने डोळे मिटलेले असतांना दृष्टी ऊर्ध्व (वर) होऊ लागणे : नंतर दरबारी कानडा रागातील स्पंदनांचा प्रवास अनाहतचक्राच्या वरच्या दिशेने होत असल्याचे जाणवले. राग ऐकतांना डोळे मिटलेल्या अवस्थेत माझी दृष्टी ऊर्ध्व (वर) होऊ लागली.
१ उ. सहस्रारचक्रावर थंडावा जाणवू लागणे आणि सुषुम्ना नाडी आरंभ होणे : मला माझ्या डोक्यामध्ये थंडावा जाणवू लागला, तसेच सहस्रारचक्रावरही थंडावा जाणवू लागला. माझे डोके हलके झाले. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी आरंभ (चालू) झाली.
१ ऊ. दरबारी कानडा रागामुळे सर्व शरीर हलके होणे, तसेच ते शवासनात अंग ढिले सोडतो, तसे ढिले पडणे, ही झोप लागण्याची अवस्था असणे आणि २० मिनिटांच्या रागगायनामुळे हा परिणाम साध्य झाला असणे : मला गुंगी येऊ लागली. माझे सर्व शरीर हलके होऊ लागले, तसेच ते शवासनात अंग ढिले सोडतो, तसे ढिले पडू लागले आणि तेवढ्यात रागगायन संपले. ही झोप लागण्याची अवस्था आहे. रागगायन २० मिनिटांचे झाले. याचा अर्थ एवढ्या अल्प कालावधीत दरबारी कानडा रागाने आपला परिणाम साध्य केला.
२. राग जोग
२ अ. रागाच्या आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.
२ आ. जोग रागाची स्पंदने अनाहत आणि मणिपुर चक्रांमध्ये जाणवून तेथे थंडावा निर्माण होणे अन् त्यामुळे भावना आणि विचार यांचे प्रमाण न्यून होण्यास साहाय्य होणे : जोग राग आरंभ झाल्यावर मला माझ्या अनाहतचक्रावर हलकीशी थंड स्पंदने जाणवू लागली. ३ – ४ मिनिटांनी तशीच स्पंदने खालील मणिपूरचक्रावरही जाणवू लागली. थंड स्पंदनांमुळे त्या चक्रांचे कार्य मंदावते. अनाहत आणि मणिपूर या चक्रांचे कार्य मंदावल्यामुळे भावना अन् विचार यांचे प्रमाण न्यून होण्यास साहाय्य होते.
२ इ. जोग रागामुळे श्वासाच्या नाडीवर कुठलाही परिणाम न झाल्याने माझी सूर्यनाडीच कार्यरत राहिली.
२ ई. जोग रागाच्या स्पंदनांचा परिणाम संथ असल्याचे जाणवल्याने त्या रागाला पूरक अशी ‘तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’ ही वायुतत्त्वाची मुद्रा केल्यावर रागाची स्पंदने शरिरात भरभर पसरून देहात थंडावा पसरणे आणि ध्यान लागू लागणे : जोग रागाच्या स्पंदनांचा परिणाम संथ असल्याचे जाणवले. या रागाला पूरक मुद्रा शोधली असता ती ‘तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’ ही वायुतत्त्वाची मुद्रा आली. ती मुद्रा केल्यावर रागाची स्पंदने शरिरात भरभर पसरू लागली. त्या स्पंदनांना वेग आला. याचा परिणाम होऊन थंडावा पूर्ण देहात पसरला. त्यामुळे माझे ध्यान लागू लागले.
२ उ. जोग रागाला पूरक अशी मुद्रा केल्याने रागाची स्पंदने अनाहतचक्राच्या वरील चक्रांमध्येही पसरून डोक्यातही थंडावा जाणवू लागणे : वरील मुद्रा केल्यावर रागाची स्पंदने अनाहतचक्राच्या वरील चक्रांमध्येही पसरू लागली. त्यामुळे मला माझ्या डोक्यातही थंडावा जाणवू लागला. अशा रितीने ती मुद्रा करण्याचा लाभ झाला.
२ ऊ. छाती आणि डोके यांवर परिणाम होऊन अनुक्रमे मन अन् बुद्धी शांत झाल्याने झोप लागते आणि अशा रितीने जोग रागाचा परिणाम होतो.
३. राग मालकंस
अ. मालकंस राग आरंभ होण्यापूर्वी माझी सूर्यनाडी चालू होती.
आ. या रागामधील गायन संथ आहे. त्यामुळे मन शांत होते.
इ. ‘मालकंस राग अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार या चक्रांना थंडावा देऊन अकार्यरत करणारा आहे’, असे जाणवले. या चारही चक्रांवर मालकंस रागाने एकाच वेळी परिणाम केला.
ई. रागाच्या वरील परिणामांमुळे आपोआपच शरिराची गात्रे शिथील होऊन झोप लागते. हा राग ऐकतांना ‘मला कधी झोप लागली’, हे कळलेच नाही. त्यामुळे मला या रागाचे ध्वनीमुद्रण ऐकावे लागले. ते ऐकतांनाही २ वेळा ‘मी कधी झोपलो’, हे मला कळलेच नाही. त्यामुळे रागाचे परीक्षण करण्यासाठी तो तिसर्यांदा ऐकतांना मला मनाचा निश्चय करून तो ऐकावा लागला. इतका मालकंस राग परिणामकारक आहे.
उ. शेवटी संपूर्ण शरिरात थंडावा निर्माण झाला.
ऊ. या रागामुळे श्वासाची नाडी मात्र पालटली नाही. माझी सूर्यनाडीच कार्यरत राहिली. याचे कारण म्हणजे वातावरणात सूक्ष्मातील युद्ध चालू होते. या युद्धामध्ये शरिराचे रक्षण होण्यासाठी माझ्या देहाने सूर्यनाडी चालू केली. यासह रागातील चैतन्यामुळे शरिराला थंडावाही मिळत होता. या युद्धाच्या परिणामामुळे मला सतत ग्लानी येत होती.
४. दरबारी कानडा, जोग आणि मालकंस या रागांच्या परिणामांचा सारांश
या तिन्ही रागांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे गायन संथ आहे. त्यामुळे ते ‘अंगाईगीतासारखे’ परिणाम करते.
४ अ. दरबारी कानडा : हा राग छाती आणि डोके यांना, म्हणजेच मन अन् बुद्धी यांना थंडावा देऊन शांत करतो. तसेच तो सर्व शरिराला हलके करून ढिले करतो.
४ आ. जोग : राग जोग अनाहत आणि मणिपूर चक्रांमध्ये थंडावा निर्माण करून भावना अन् विचार यांचे प्रमाण न्यून करतो. त्यामुळे झोप येण्यास साहाय्य होते. या रागाच्या परिणामाची गती संथ होती. तिला चालना देण्यासाठी दोन्ही हातांच्या बोटांची ‘तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’ ही वायुतत्त्वाची मुद्रा करण्याचा लाभ होतो.
४ इ. मालकंस : मालकंस राग अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार या चक्रांना थांडावा देऊन अकार्यरत करतो. तसेच या रागामुळे सर्व शरिरालाही थंडावा मिळतो.
एकूण हे तिन्ही राग थंडाव्याद्वारे मन आणि बुद्धी अकार्यरत करून अन् शरिराचे जडत्व दूर करून निद्रा आणतात.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.९.२०१८)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/530807.html
|