गोव्याच्या इतिहासात प्रथमच खाण क्षेत्रांचा लिलाव होणार
१५ डिसेंबरपर्यंत ८ खाण क्षेत्रांचा लिलाव !
पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – गोवा खाण महामंडळाकडून १५ डिसेंबर २०२१ पर्यंत गोव्यातील ८ खाण क्षेत्रांचा लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. मंत्रीमंडळासमवेत झालेल्या त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, ‘‘गोव्यातील पहिल्या गटातील खाण क्षेत्रांचा लिलाव करण्याची पूर्वसिद्धता चालू आहे. डिसेंबर मासाच्या मध्यापर्यंत ५ ते ८ खाण क्षेत्रांचा लिलाव करण्यात येईल. या लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन’ ही संस्था सरकारला साहाय्य करत आहे. या संस्थेला देण्यात येणार्या शुल्काविषयी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. गोवा खाण महामंडळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साहाय्याने हा लिलाव करणार आहे. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच खाण क्षेत्रांचा लिलाव होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील सर्व खाण लीज (परवाने) रहित केल्याने खाण क्षेत्रांचा लिलाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यापूर्वी गोवा सरकारने खाण लिज विभागाच्या परिसरात साठवून ठेवलेल्या खनिजांचा लिलाव केला आहे.’’