पुणे येथील मावळ तालुक्यातील ६५ नागरिकांना विषबाधा !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – मावळ तालुक्यातील शिवली आणि भाडवली या २ गावांतील ६५ नागरिकांना स्थानिक धार्मिक उत्सवात बनवलेल्या प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व लोकांना जवळच्या स्थानिक रुग्णालय तसेच पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्रसादासाठी वापरण्यात आलेल्या पाण्यात गरजेपेक्षा क्लोरीनची मात्र अधिक असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे. गावातील पिण्याचे पाणी दूषित असल्याने ही घटना घडल्याची चर्चा नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात चालू असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्हा परिषदेचे अधिकारी सुधीर भागवत म्हणाले की, या उत्सवाला साधारण २५० लोक उपस्थित होते; मात्र त्यातील केवळ ६० ते ६५ लोकांनाच विषबाधा झाली आहे. घटनास्थळावरून अन्न आणि पाण्याचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी राज्याच्या आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानंतर नेमके कारण कळू शकेल.