श्री. भरमाणी तिरवीर आणि सौ. सुमन तिरवीर यांची मुलगी कु. मानसी तिरवीर हिला तिच्या आई-वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
श्री. भरमाणी तिरवीर (वय ४७ वर्षे) आणि सौ. सुमन तिरवीर (वय ४२ वर्षे) यांची रामनाथी आश्रमात रहाणारी मुलगी कु. मानसी तिरवीर (वय १८ वर्षे) हिला तिच्या आई-वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. वडिलांनी लहानपणापासून कष्ट करून कुटुंबाचा सांभाळ करणे
‘माझे बाबा श्री. भरमाणी तिरवीर (वय ४७ वर्षे) यांनी लहानपणापासून पुष्कळ कष्ट करून कुटुंबाचा सांभाळ केला. त्यांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे बाबांनी केवळ चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यांनी काम करण्यास आरंभ केला. ते कामासाठी कर्नाटकातून सिंधुदुर्ग येथे आले आणि त्यांनी कुडाळ येथे स्वतःचे घर बांधले.
२. आई-वडिलांनी मुलीवर चांगले संस्कार करणे
माझे बाबा आणि आई सौ. सुमन तिरवीर (वय ४२ वर्षे) यांनी माझ्यावर लहान वयापासूनच चांगले संस्कार केले. त्यांनी मला साधनेसाठी पुष्कळ साहाय्य केले.
२ अ. आई-वडिलांनी साधिकेला सात्त्विक वेशभूषा करण्याची सवय लावणे : लहानपणी आई-बाबा माझी सात्त्विक वेशभूषा करत. त्यांनी लहानपणापासून आतापर्यंत एकदाही मला पाश्चात्त्य वेशभूषा करू दिली नाही. बाबांना काळ्या रंगाचे कपडे आवडत नाहीत. मी लहानपणी त्यांसाठी हट्ट करायचे. तेव्हा बाबा मला समजावून सांगायचे की, काळ्या रंगाचे कपडे घातल्याने आवरण येते आणि त्रास होतो.
२ आ. लहानपणी कुडाळ सेवाकेंद्रात घेऊन जात असल्यामुळे साधनेची तळमळ वाढणे : मी ५ वर्षांची असतांना त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली. त्या वेळी कुडाळ सेवाकेंद्राचे काम चालू होते. मी लहान असतांना बाबा मला तिकडे घेऊन जायचे. त्यामुळे माझी साधनेची तळमळ आपोआप वाढली.
२ इ. आईने सायंकाळी देवासमोर दिवा लावून आरती आणि श्लोक म्हणण्यास शिकवले.
२ ई. मुलीचा हट्टी स्वभाव घालवण्यास साहाय्य करणे : मी लहानपणी पुष्कळ हट्टी होते. मला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असायची; पण आई-बाबा मला जे योग्य आहे, तेच त्या वेळी द्यायचे. जे अनावश्यक असेल, ते ‘आता नको नंतर देतो’, असे समजावून सांगायचे. मी ऐकले नाही, तर रागवायचे. तेव्हा मला पुष्कळ प्रतिक्रिया यायच्या; पण आता लक्षात येते की, तेव्हा ते मला ओरडले नसते, तर मला मनाविरुद्ध वागायची सवय लागली नसती.
३. आई-वडिलांनी एकुलत्या एका मुलीला पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणे
बाबांनी मला साधनेत पुष्कळ साहाय्य केले. ‘मी पूर्णवेळ साधना करते’, असे सांगितल्यावर त्यांनी मला प्रोत्साहन दिले. ते मला म्हणाले, ‘‘या रज-तमाच्या वातावरणात रहाण्यापेक्षा तू गुरुचरणीच जा.’’ आईने मला ‘तू एवढ्यात पूर्णवेळ साधना करू नकोस’, असे म्हटल्यावर बाबांनी तिला समजावून सांगितले. तेव्हा आईनेही सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर आईने तिला शारीरिक त्रास होत असतांनासुद्धा ‘तू घरी थांब आणि मला साहाय्य कर’, असे मला कधीही म्हटले नाही. नातेवाइकांचा मी पूर्णवेळ साधना करण्याला विरोध होता; परंतु आई-बाबांनी त्यांना समजावले.
४. आईने लहानपणीच घरातील सर्व कामे शिकवल्यामुळे साधिकेला लहान वयात कुडाळ सेवाकेंद्रात रहाता येणे
आईने मला लहानपणीच घरातील सर्व कामे करायला शिकवली. तेव्हा मला वाटायचे की, ‘आई मला या वयात स्वयंपाक करणे आणि इतर कामे का शिकवते ?’ आता माझ्या लक्षात येते की, ‘पुढच्या आपत्काळाच्या दृष्टीने गुरुदेवांनीच आईच्या माध्यमातून मला शिकवले.’ आई-बाबांनी मला त्यांच्यात अडकू दिले नाही. ते मला नातेवाइकांकडे सोडून कामाला जायचे. तेव्हा त्यांनी मला ‘स्वतःची वैयक्तिक कामे कशी करायची ? एकटे कसे रहायचे ?’, हे शिकवले. त्यामुळे मला लहानपणापासूनच कुडाळ सेवाकेंद्रात रहाता आले.
५. आई-वडिलांमध्ये शिकण्याची वृत्ती असणे
आई-बाबांमध्ये शिकण्याची वृत्ती आहे. मी कुडाळ सेवाकेंद्रात किंवा रामनाथी आश्रमात असतांना आई मला विचारायची, ‘‘आज कोणता पदार्थ करायला शिकलीस ?’’ तो पदार्थ तिला करायला येत असला, तरी ती त्याविषयी माझ्याकडून जाणून घ्यायची. सध्या मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत आहे. बाबा मला प्रतिदिन विचारतात, ‘‘आज आढाव्यात काय झाले ? तू काय प्रयत्न केलेस ? मी कोणते प्रयत्न करू ?’’ यावरून मला आई-बाबांमध्ये शिकण्याची वृत्ती असल्याचे जाणवते.
६. आई-वडिलांची गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा असणे
आताच्या या आपत्कालीन स्थितीमध्ये म्हणजे कोरोनाच्या काळातही आई-बाबांना कसलीही काळजी वाटत नाही. ते म्हणतात,‘‘गुरुदेव सर्व सांभाळतील. त्यांनी आपल्याला पुष्कळ दिले आहे. त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा करणार ?’’ त्यांची ही स्थिरता बघून मलाही गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. गुरुदेवांवर त्यांची पुष्कळ श्रद्धा आहे.
७. आई-बाबांची आहे गुरुमाऊलींप्रती अपार भक्ती ।
हे गुरुमाऊली, आई-बाबांच्या माध्यमातून ।
तुम्हीच दिलीत कृपेची सावली ।। १ ।।
त्यांची आहे गुरुमाऊलींप्रती (टीप १) अपार भक्ती ।
मुलीविषयी नाही त्यांना कोणतीच आसक्ती ।। २ ।।
दृढ श्रद्धा मनी ठेवूनी ।
सर्वस्वाचा त्याग केला दोघांनी ।। ३ ।।
मुलीस मायेपासून दूर ठेवूनी ।
गुरुचरणांसी ठेवले त्यांनी अंतर्मनी ।। ४ ।।
मुलीस साधनेत साहाय्य करूनी ।
सदैव कृतज्ञ रहाती गुरुचरणी ।। ५ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘हे गुरुराया, ‘आई-बाबांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. त्यांचे (आई-बाबांचे) गुण माझ्यात येण्यासाठी तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या. माझ्या साधनेसाठी तुम्ही मला असे आध्यात्मिक आई-बाबा दिलेत, यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. मानसी भरमाणी तिरवीर (वय १८ वर्षे), कुडाळ, सिंधुदुर्ग. (१८.६.२०२१)