छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी खर्या अर्थाने गोमंतकीय संस्कृती जोपासली ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
गोवा विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन
पणजी, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – पोर्तुगिजांच्या आक्रमणांपासून गोमंतकीय संस्कृतीचे रक्षण करणे आणि ती जोपासणे यांचे कार्य खर्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज अन् धर्मवीर संभाजी महाराज यांनी केले आहे. गोवा विद्यापिठात इतर देशांचा इतिहास शिकवला जातो; मात्र गोव्याचा इतिहास शिकवला जात नाही, हे खेदजनक असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. ताळगाव येथील गोवा विद्यापिठातील मनोहर पर्रीकर कायदा विद्यालयातील प्रशासन आणि सार्वजनिक धोरण विभागात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते २३ नोव्हेंबर या दिवशी करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी उच्च शिक्षण खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, कुलगुरु हरिलाल मेनन, कुलसचिव व्ही.एस्. नाडकर्णी, मनोहर पर्रीकर विद्यालयाच्या अधिष्ठाता शैला डिसोझा आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘विधानसभेच्या अधिवेशनात घोषित केल्यानुसार विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र प्रारंभ होत असल्याने मला आनंद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घेणे आजच्या युगात महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कार्यान्वित केलेल्या शासनाची धोरणे आणि सार्वजनिक धोरण यांची अंमलबजावणी आज काळाची आवश्यकता आहे.’’