प्रत्येक कृती परिपूर्ण करणार्‍या, समाधानी वृत्तीच्या आणि इतरांचा विचार करणार्‍या बराकर (बंगाल) येथील श्रीमती केसरी देवी भुकानिया (वय ७८ वर्षे) !

श्रीमती केसरीदेवी भुकानिया

१. प्रत्येक कृती परिपूर्ण करणे

‘आई प्रत्येक कृती परिपूर्ण आणि ईश्वराला अपेक्षित अशी ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ करते, उदा. कपड्यांच्या घड्या घालणे, अंथरूण आवरणे. तिने आम्हा भावंडांवरही परिपूर्ण कृती करण्याचा संस्कार केला आहे. तिने आम्हाला लहानपणापासून सकाळी उठल्यानंतर प्रथम अंथरूण आवरून ते नीट घडी घालून ठेवायला शिकवले आहे.

२. विचारण्याची वृत्ती

आई प्रत्येक कृती विचारून करते. आईला स्वयंपाक करण्याची आवड होती. ती एखादा पदार्थ बनवण्यापूर्वी तिच्या सासूबाईंना त्यात लागणार्‍या साहित्यांचे प्रमाण विचारून घेत असे. मी लहानपणी आईला विचारायचे, ‘‘तुला सर्व येते, तरी तू आजीला का विचारतेस ?’’ त्यावर आई मला समजावून सांगत असे, ‘‘विचारून केल्याने कर्तेपणा येत नाही.’’ तिचे एवढे वय होऊनही ती तिच्यापेक्षा लहान-थोर व्यक्तींना विचारूनच कामे करते.

३. कुटुंबियांशी समभावाने वागणे

माझे मोठे काका आणि आम्ही एकत्र कुटुंबात रहात होतो. त्या वेळी कुटुंबात पुष्कळ मुले होती. तिने सर्व मुलांना सारखेच मानले. ती घरात असलेला खाऊ आणि अन्य वस्तू सर्वांना सम प्रमाणात वाटून देत असे. तिच्या मनात कधी असा विचार आला नाही की, आपल्या मुलांना अधिक द्यायला हवे. आमच्या विवाहाच्या वेळी तिने आम्हाला जसे कपडे घेतले, तशाच प्रकारचे कपडे तिने मोठ्या काकांच्या मुलांनाही घेऊन दिले. आजही तिचे वागणे तसेच आहे. एकदा मी तिला सांगितले, ‘‘मी आणि ताईने हिर्‍यांच्या बांगड्या केल्या आहेत.’’ तेव्हा आईने सांगितले, ‘‘तुम्हा दोघींचे झाले, ते चांगले आहे; परंतु सरितालाही (चुलत बहिणीलाही) बांगड्या झाल्या असत्या, तर बरे झाले असते.’’

४. कुटुंबियांची सेवा करणे

४ अ. काकांना अपरात्री जेवण करून वाढणे : माझ्या मोठ्या काकांना (आईच्या मोठ्या दिरांना) रात्री २ – ३ वाजता भोजन करण्याची सवय होती. त्या काळी लोक लवकरच झोपत असत, तरीही माझी आई रात्री २ – ३ वाजता उठून त्यांना भोजनात गरम पोळ्या करून देत असे. ती प्रत्येक दिवशी पोळ्या करायची, तरीही तिच्या तोंडवळ्यावर कसलीच तक्रार दिसायची नाही.

४ आ. मोठ्या जावेची सेवा करणे : आई बाहेर जातांना माझ्या मोठ्या आईला (आईच्या मोठ्या जावेला) त्रास होऊ नये; म्हणून तिचा हात धरून चालत असे. एकदा आम्ही चारधाम यात्रेला गेलो होतो. त्या वेळी प्रत्येक दिवशी आम्ही यात्रेहून परत आल्यानंतर आई थकलेली असूनही प्रतिदिन मोठ्या आईचे पाय चेपून देत असे. त्यांचे कपडे बॅगेतून काढून देत होती. ती प्रत्येक ठिकाणी मोठ्या आईला कसलाही त्रास होऊ नये, अशी काळजी घेत असे.

५. इतरांचा विचार करणे

पू. (सौ.) सुनीता खेमका

आई नेहमी स्वतःचा अल्प आणि इतरांचा विचार अधिक करते. एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूची आवश्यकता असल्यास आई तिला ती वस्तू तत्परतेने देते. समोरच्या व्यक्तीला एखादी वस्तू उपयुक्त असेल, तर ‘ती वस्तू माझ्याकडे नसली, तरी चालेल’, असा तिचा विचार असतो. आजही तिच्याकडे कुणी काही मागितले, तर ती एका क्षणाचाही विचार न करता साहाय्य करते. तिला एवढा शारीरिक त्रास असूनही एखादा सण आणि उत्सव येतो, त्या वेळी ती स्वतः घरातील सदस्यांसह उत्सवाची सिद्धता करते.

६. आसक्ती नसणे

आईला कोणत्याही वस्तूची आसक्ती नाही. दागदागिने, कपडे ज्या वस्तूविषयी सर्वसाधारण महिलांना आसक्ती असते, तसे तिचे कधीच नसते. जेवढे आहे ते पुष्कळ आहे, अशी तिची वृत्ती असते. केवळ वस्तूंचेच नाही, तर आपल्या मुलांविषयीही तिला कधी अधिक मोह नव्हता. आता वय झाल्यामुळे तिला बरेच शारीरिक त्रास आहेत; परंतु ‘मुलांनी मला भेटायला यावे, माझ्यासह बसावे’, असा तिचा कधी आग्रह नसतो. तिने वडिलांकडे कधी एक पैसाही मागितला नाही. ती आपल्या मुलांनासुद्धा कधी सांगत नाही की, मला ही गोष्ट हवी आहे.

७. सहनशील

आईला होत असलेला त्रास तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावरच ती इतरांना सांगते. ‘माझ्यामुळे इतरांना त्रास नको ’, असा तिचा भाव असतो.

८. स्वीकारण्याची वृत्ती

जीवनात आलेली प्रत्येक परिस्थिती मनापासून स्वीकारून ती स्थिर रहाते. माझ्या वडिलांचे निधन झाल्यावरही ती पुष्कळ स्थिर होती. वडिलांच्या निधनाच्या वेळी आमच्या कुटुंबातील सदस्य आले नाहीत; परंतु काही दिवसांनंतर ते नातेवाईक अन्य नातेवाईकांच्या विवाहाला गेले. त्यामुळे आम्हा सर्वांना वाईट वाटले; परंतु आई या परिस्थितीतही स्थिर होती आणि तिने आम्हाला योग्य दृष्टीकोन दिला.

९. ईश्वरावर दृढ श्रद्धा

तिची ईश्वरावर दृढ श्रद्धा आहे. पहिल्यापासूनच आमचे एकत्र कुटुंब आहे. माझ्या आजोबांपासून (वडिलांचे वडील) आमचे एकत्र कुटुंब आहे. आमच्या कुटुंबात ‘श्री खाटू श्याम बाबां’च्या (भीमाचा नातू बर्बरीक याला श्रीकृष्णाने ‘कलियुगात तुला माझ्या नावाने ओळखले आणि पूजले जाईल’, असा आशीर्वाद दिला होता. महाभारत युद्धाच्या वेळी बर्बरीकचे मस्तक खाटू गावात ठेवले होते. त्यामुळे त्यांना ‘खाटू श्याम बाबा’ या नावाने ओळखले जाते.) पूजेची परंपरा आहे. पूजा-पाठ, भक्ती, नामस्मरण अशा प्रकारे आईची साधना पूर्वीपासूनच चालू आहे. तिने आम्हा मुलांवरही असेच संस्कार केले आहेत. आम्ही लहान असतांना ‘श्यामबाबांचा पाठ केल्यावरच भोजन करायचे’, असे आईने आम्हाला शिकवले होते.

– पू. (सौ.) सुनीता खेमका (कन्या), धनबाद (१२.३.२०२१)