पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या कुंडलीच्या अभ्यासातून संतपदाविषयी लक्षात आलेल्या सूत्राप्रमाणे प्रत्यक्षातही घडणे
‘वर्ष २०१२ मध्ये परात्पर गुरुदेवांनी मला कु. दीपाली मतकर यांच्यासह अन्य दोन साधिकांच्या कुंडल्यांचा अभ्यास करण्यास सुचवले होते. त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास केल्यावर गुरुदेवांच्या कृपेने माझ्या लक्षात आले, ‘या तीन साधिकांपैकी कु. दीपालीताई अध्यात्मात प्रगती जलदगतीने करून संतपद प्राप्त करतील.’ हे गुरुदेवांना कळवल्यावर त्यांनी मला ‘दीपाली वयाच्या कितव्या वर्षी संतपद प्राप्त करील ?’, याचा अभ्यास करण्यास सांगितले. त्याविषयी अभ्यास करतांना गुरुदेवांनीच मला आतून उत्तर दिले, ‘कु. दीपाली वयाची ३३ वर्षे पूर्ण झाल्यावर लगेच संतपद प्राप्त करतील.’ त्या वेळी गुरुदेवांनी मला कळवले, ‘‘याची नोंद करा. दीपाली संत झाल्यावर छापूया.’’ त्याप्रमाणे वयाची ३३ वर्षे पूर्ण झाल्यावर २८.१०.२०२१ या दिवशी गुरुपुष्यामृतयोगावर कु. दीपालीताई सनातनच्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. हे कळल्यावर मला माझी मुलगीच संत झाल्याप्रमाणे आनंद झाला.
परात्पर गुरुदेवच माझ्याकडून साधक आणि संत यांच्या पत्रिकांचा अभ्यास करवून घेतात अन् तेच मला आतून सर्व उत्तरे सुचवतात. गुरुदेवांची ही महानता मी नेहमीच अनुभवली आहे. ‘गुरुदेवांना अपेक्षित सेवा माझ्याकडून अविरत घडो’, अशी त्यांच्या कोमल चरणी प्रार्थना !’
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमलशास्त्री आणि हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.१०.२०२१)
(हे लिखाण पू. (कु.) दीपाली मतकर संत होण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख कु. दीपालीताई असा केला आहे. – संकलक)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |