साधकांची साधना गतीने होण्यासाठी त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेची आवड निर्माण करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर !

समष्टी संत झाल्यावर देवाशी अनुसंधान अधिक व्यापक प्रमाणात साधले जाते. त्यामुळे समष्टी साधनेत देवाला काय अपेक्षित आहे, हे कळते !

– परात्पर गुरु डॉ. आठवले

पू. (कु.) दीपाली मतकर

१. ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तीव्र तळमळ असल्याने स्वतःला विसरून साधकांना पुरेसा वेळ देणे

‘कु. दीपाली मतकर हिला साधकांची साधना योग्य मार्गाने आणि गतीने व्हावी’, अशी तीव्र तळमळ आहे. ती प्रतिदिन साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेते. ती स्वतःला विसरून साधकांना पुरेसा वेळ देते आणि रात्री उशिरापर्यंत जागून स्वतःची कामे पूर्ण करते.

२. साधकांकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया कृतीच्या स्तरावर राबवून घेणे

२ अ. साधकांना मध्येच प्रश्न विचारून अन्य साधकांचे आढावे लक्षपूर्वक ऐकण्यास प्रवृत्त करणे : व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना ‘कोण काय आढावा देतो ?’, याकडे दीपालीताईचे बारकाईने लक्ष असते. ती कधीकधी आम्हाला मध्येच विचारते, ‘‘यांचे प्रयत्न ऐकून काय वाटले ?’’ तेव्हा ‘आपण इतरांचा आढावा नीट ऐकत नाही. त्यामुळे आपल्याला त्यातील बारकावे लक्षात येत नाहीत’, याची साधकांना जाणीव होते आणि ते अन्य साधकांचा आढावा लक्षपूर्वक ऐकण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे त्यांना ‘अन्य सर्वजण कसे प्रयत्न करतात ?’, हेही लक्षात येऊ लागते.

२ आ. स्वभावदोष आणि अहं यांची व्याप्ती काढल्याने ‘कोणकोणत्या प्रसंगांत स्वभावदोष उफाळून येतात ?’, यांचा अभ्यास होऊन अंतर्मुखता अन् सकारात्मकता वाढणे : प्रत्येक साधक ‘स्वभावदोष आणि अहं यांची व्याप्ती काढत आहे ना ? त्यांना काही अडचणी आहेत का ?’, याकडे लक्ष देऊन ताई साधकांना त्यावरील उपाययोजना सांगते. त्यामुळे ‘दिवसभरात कोणकोणत्या प्रसंगांत स्वभावदोष उफाळून  येतात ?’, याचा साधकांचा अभ्यास होऊन त्यांच्यातील अंतर्मुखता वाढली. ताई ‘साधकांच्या स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंच्या व्याप्तीत नव्याने लक्षात येणारे पैलू अंतर्भूत केले जात आहते ना ?’, याचा आढावा घेते. त्यामुळे भूतकाळात झालेल्या चुका माझ्या लक्षात येऊन चुका होण्याचे प्रमाण न्यून होऊ लागले आणि माझी सकारात्मकता वाढली.

२ इ. दीपालीताईने सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्यावर आनंद मिळू लागणे : मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे महत्त्व विचारांच्या स्तरावर पटले होते; पण मी अल्पसंतुष्ट होतो. त्या वेळी ताईने मला ‘‘केवळ प्रक्रियेच्या विचारांत असणे पुरेसे नाही, तर त्यासाठी प्रयत्न करायला हवेत’’, असे सांगून जाणीव करून दिली. ताई ‘प्रयत्न काय करायचे ?’, हे सांगत असतांनाही मी माझ्याच विचारांत असायचो. तेव्हा तिने पुन्हा सांगितले, ‘‘साधकांना चुका विचारणे, स्वतःकडून झालेली चूक सांगणे, क्षमायाचना करणे, प्रतिदिन फलकावर चूक लिहिणे, स्वतःच्या मनाला दिशा देणे, प्रतिदिन सारणी लिखाण आणि स्वयंसूचना सत्रे पूर्ण करणे, या कृती दिवसभरात किती वेळा होतात ?’, यांचा आढावा घ्या.’’

साधकांना या कृतींची सवय लागण्यासाठी ताई सर्व प्रयत्न करत होती. या कृती करायची सवय लागल्यावर आम्हाला आनंद मिळू लागला.

३. भावाच्या स्तरावर आढावा घेतल्यामुळे झालेले लाभ !

श्री. दत्तात्रय पिसे

३ अ. आढाव्यापूर्वी मानस दृष्ट काढल्यामुळे भावजागृती होऊन वातावरण चैतन्यमय होणे : ताई आढावा घेण्यापूर्वी मानस दृष्ट काढायची. तेव्हा ती हनुमंताला आर्ततेने हाक मारायची. ताईने ‘रामभक्त हनुमंता’, असे म्हटल्यावर आमचा भाव जागृत व्हायचा. त्या वेळी वातावरणात हलकेपणा जाणवून ते चैतन्यमय व्हायचे. त्यामुळे आम्हाला आढावा हवाहवासा वाटायचा.

३ आ. साधकाला आवश्यक आहे, तेच दीपालीताईकडून सांगितले जात असल्याने ‘देवच तिच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे’, असे वाटणे : ताईच्या माध्यमातून ‘देवच आम्हाला मार्गदर्शन करत आहे’, असे मला वाटते. आढावा घेतांना ‘साधकाला जे आवश्यक आहे, तेच ताईकडून सांगितले जाते’, असे अनेक वेळा जाणवते. माझ्यातील अहंचे पैलू, जे मला ठाऊक नाहीत, तेच ताईकडून सांगितले जायचे. आरंभी मला ‘प्रतिदिन काय चुका होतात ?’, हेच लक्षात येत नव्हते. ताईने आढाव्यात याविषयीचे सूत्र सांगितले. यामुळे माझ्यासाठी प्रतिदिनचा आढावा हा आश्चर्यकारकच असायचा. माझी प्रक्रिया चांगली होण्यासाठी मला ताईचे अमूल्य साहाय्य मिळायचे.

३ इ. प्रक्रिया गांभीर्याने राबवण्याचा निश्चय होऊन कृतीच्या स्तरावर प्रयत्न होऊ लागणे : आढावा घेतांना ताईच्या शब्दांतून चैतन्य, तिचा आध्यात्मिक अधिकार आणि तिची विषयावर असलेली कुशल पकड जाणवते. ती आढाव्याचा समारोप करतांना आमचा शरणागतभाव वाढायचा. या आढाव्यामुळे प्रक्रिया गांभीर्याने राबवण्याचा माझा निश्चय झाला आणि माझे कृतीच्या स्तरावर प्रयत्न चालू झाले. ही प्रक्रिया थोड्या प्रमाणात राबवली, तरी ‘दिवसभरातील आनंदात पुष्कळ वाढ होत आहे’, हे मला नित्य अनुभवायला येत आहे.

गुरुदेवांनी ‘आमची साधना व्हावी’, यासाठी दीपालीताईला पाठवले; पण तिचा लाभ करून घेण्यास आम्ही न्यून पडत आहोत. ‘गुरुदेवा, ताईने केलेले मार्गदर्शन कृतीत येण्यासाठी आपणच आम्हाला बळ द्यावे’, अशी आपल्या चरणी याचना करत आहे.

गुरुदेवा, आमच्या साधनेसाठी मार्गदर्शक म्हणून आपण आम्हाला ‘आध्यात्मिक ताई’ दिलीत. त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. दत्तात्रय पिसे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सोलापूर (११.४.२०२०)

(हे लिखाण पू. (कु.) दीपाली मतकर संत होण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख कु. दीपालीताई असा केला आहे. – संकलक)