साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी अधिक असहिष्णू अन् विरोधकांप्रती निर्दयी असणे !
विश्वभरात साम्यवादी आणि जिहादी यांच्या असहिष्णुतेच्या घटना होत असतांना भारतातील कथित बुद्धीवंत गप्प का ? – संपादक
सध्या साम्यवादी (कम्युनिस्ट) आणि जिहादी हे उदारमतवादी (लिबरालीझम) असल्याचे ढोंग करत आहेत. बहुरूपी धूर्त असल्याप्रमाणे हे साम्यवादी आणि जिहादी जगभरात मानवाधिकार, महिलांचे अधिकार, अल्पसंख्यांकांचे अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेची वकिली करतांना दिसतात. सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर पाहिले, तर या दोन्ही विचारसरणींहून अधिक असहिष्णू अन् विरोधकांप्रती निर्दयी दुसरे कुणीच नसेल. यासाठी कुठल्या पुराव्यांची आवश्यकता नाही; कारण या दोघांचीही मूळ पुस्तके वाचली, तरी पुरेसे आहे. या दोन्ही विचारसरणींच्या असहिष्णुतेच्या अनेक उदाहरणांनी इतिहासाची पानेच्या पाने भरलेली आहेत. याविषयी काही ताज्या घटना पहाता येतील.
तुर्कस्तानातील हागिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीमध्ये रूपांतर करणे
नुकतेच तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलमध्ये राष्ट्राध्यक्ष इर्दोगन यांनी हागिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीमध्ये रूपांतर केले. हागिया सोफिया मुळात एक चर्च आहे आणि ही भव्य इमारत वर्ष ५३७ मध्ये रोमन सम्राट जस्टिनियन याने उभारली होती. वर्ष १४५३ मध्ये तुर्कीचे सुलतान महंमद द्वितीय यांनी इस्तंबूल कह्यात घेतला आणि या इमारतीचे रूपांतर मशिदीत केले. त्यानंतर तुर्कीचे उदारवादी निर्माता कमाल अतातुर्क यांनी या इमारतीला एका संग्रहालयात रूपांतरित करून सर्वधर्म आणि संस्कृती यांच्यासाठी उघडे केले. आता राष्ट्राध्यक्ष इर्दाेगन यांनी ही इमारत पुन्हा मशिदीत रूपांतरित केली. या निर्णयावर ‘किंग्ज कॉलेज लंडन’च्या प्राध्यापिका जुडिथ हेरिन यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, ‘इर्दोगन यांनी प्रतिकात्मक रूपात सहिष्णुतेच्या वारशाचा अंत केला आहे.’ इस्तंबूलमध्ये शतकांपासून ख्रिस्ती, मुसलमान आणि ज्यू एकत्र नांदत आले आहेत. हेरिन म्हणतात की, ‘हागिया सोफिया ही संयुक्त राष्ट्राने घोषित केलेली वारसा इमारत आहे. ती संपूर्ण जगाची ठेव आहे. तिला केवळ मुसलमानांना सोपवणे, म्हणजे एक प्रकारे सांस्कृतिक स्वच्छता केल्यासारखे आहे.’
चीनमध्ये उघूर मुसलमानांवर केले जाणारे अन्याय आणि अत्याचार
चीनमध्ये माओने ‘सांस्कृतिक स्वच्छता’ केली होती. आज चीनचे शी जिंगपिग सिंकियांग प्रांतात उघूर मुसलमानांच्या सफाईचे अभियान पद्धतशीरपणे राबवत आहेत. उघूर मुसलमानांच्या अल्पसंख्यांक अधिकारांचे कसे हनन होत आहे, हे सांगणारे अगणित अहवाल उपलब्ध आहेत. उघूर महिलांना गर्भ धारण करू न देणे, ‘रोजा’च्या काळात उपवास करू न देणे, तसेच विरोध करणार्यांना लाखोंच्या संख्येत सुधारगृहरूपी छळ-छावण्यांमध्ये ठेवणे, हे तिथे नित्याचेच झाले आहे.
पाकिस्तानमध्ये उभारण्यात येत असलेले हिंदूंचे मंदिर तोडले जाणे
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे हिंदूंसाठी मंदिर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा अनेक धर्मांधांनी या मंदिराच्या भिंती तोडल्या. त्यांनी सांगितले की, ‘पाकिस्तान एक इस्लामी देश आहे आणि इथे मंदिर बनवणे त्यांच्या धर्माविरुद्ध आहे.’
नुकतेच बलुचिस्तानमध्ये घर बांधतांना तथागत बुद्धांची एक प्राचीन मूर्ती सापडली, तर तीला लोकांनी फोडली. याचप्रमाणे चीनच्या साम्यवादी पक्षाने हाँगकाँगमध्ये नागरी अधिकारांवर बोलणार्यांना चिरडून रातोरात कायदा कसा पालटला, हे सर्वांनी बघितले आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनांवर भारतातील बुद्धीवंत सामान्यत: शांतच राहिले आहेत.
साम्यवादी शी जिनपिंग यांच्या विस्तारवादी धोरणाचे विविध देश बळी ठरणे !
जगातील साम्यवाद्यांचे आदर्श असलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सध्या विस्तारवादाच्या घोड्यावर स्वार आहेत. दुसर्या देशांची भूमी बळकावून तिला चीनच्या कह्यात घेणे, बळाचा वापर करून अन्य देशांना धमकावणे, हा चीनच्या साम्यवादी पक्षाचा नवीन उद्योग झाला आहे. भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया, जपान, तैवान, हाँगकाँग इत्यादी देश शी जिनपिंग आणि साम्यवादी पक्षाच्या विस्तारवादी धोरणाचे एका पाठोपाठ एक बळी ठरले आहेत. चीनच्या साम्यवादी पक्षाला आंतरराष्ट्रीय कायदे, मर्यादा आणि देशांमधील परस्पर करार यांची कुठलीच चिंता नाही. चीनच्या साम्यवादी पक्षाप्रमाणे इस्लामी जिहादीदेखील दुसर्यांचे हित आणि अधिकार मानायला सिद्ध नसतात.
साम्यवादी आणि जिहादी यांची युती देशासाठी अत्यंत धोकादायक !
हे सर्व चालू असतांना आश्चर्य याचे वाटते की, अमेरिकेतील ‘ब्लॅक लाईफ मॅटर्स’पासून ते भारतातील ‘सीएए’विरुद्धच्या (नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात) आंदोलनापर्यंत साम्यवादी आणि जिहादी दोघेही एकत्रितपणे नागरी अधिकार, मानवाधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अन् सहिष्णुता यांच्या गप्पा हाकतांना दिसतात. जो चीन त्याच्या देशामध्ये फेसबूक, ट्विटर आणि टिकटॉक या सामाजिक माध्यमाच्या वापराला अनुमती देत नाही, तो भारताने टिकटॉकवर बंदी घातली; म्हणून शहाणपणा सांगत असतो. याच दोन्ही विचारांचे लोकं भारतात ‘सीएए’विरोधी आंदोलनामध्ये ‘शाहीनबाग म्हणजे एका नव्या क्रांतीचा उद्घोष आहे’, असे सांगत होते. नंतर याच लोकांनी या आंदोलनाला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या देहली दौर्याच्या काळात दंगलीत रूपांतरित केले. ओठांवर स्वधर्माच्या श्रद्धास्थानाचे नाव आणि हातात लाल बावटा घेणार्यांची ही युती ‘विजोड’ तर आहेच; पण अत्यंत धोकादायकही आहे.
लोकशाही अधिकारांचा उपयोग तिच्या व्यवस्थांनाच नष्ट करण्यासाठी करू पहाणारे उदारमतवादी !
या दोन्ही विचारसरणींच्या लोकांनी उदारमतवादाचा बुरखा जाणीवपूर्वक घातला आहे. त्यांना ठाऊक आहे की, उदारमतवादी लोकशाही समाजात अधिकारांची चर्चा करणे ‘फॅशन’ आहे. त्यामुळे मुळातच हिंसावादी असलेल्या या विचारसरणींना प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र मिळते. हे उदारमतवादी लोकशाहीमध्ये प्रदर्शन-आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करून देशात उग्र हिंसात्मक कारवाया करत असतात. वास्तव हे आहे की, इस्लामिक कट्टरतावादी आणि साम्यवादी या दोघांनाही लोकशाही व्यवस्था अन् तिची मूल्ये यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही. ही मंडळी लोकशाही अधिकारांचा उपयोग त्याच लोकशाही व्यवस्थांना नष्ट करण्यासाठी करत असतात. हे अराजकतावादी म्हणायला फार थोडे असले, तरी यांचा बुद्धीजीवी, प्रसारमाध्यमे आणि शैक्षणिक संस्था यांमध्ये अतिशय प्रभाव आहे. त्याचा वापर करून ही मंडळी लोकशाही समाजात असंतोष, क्रोध, निराशा, प्रतिहिंसा आणि सामाजिक वैमनस्याची भावना निर्माण करत आहेत. संपूर्ण विश्वामध्ये सध्या कोरोनाचा प्रकोप चालू आहे. या परिस्थितीत कट्टरपंथीय धर्मांध आणि साम्यवादी यांना वाटते की, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अपलाभ उठवून ते लोकशाही व्यवस्थांना दुबळे करू शकतात.
भारताला सल्ले देणार्या बुद्धीजीवींचे तुर्कस्तान आणि चीन यांच्या वागण्यावर रहस्यमय मौन !
अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पाम्पिओ यांनी त्यांच्या युरोप दौर्यात स्पष्टच सांगितले की, ‘कोरोना संकटाचा लाभ उचलून चीनने लडाख आणि दक्षिण चीन महासागरात त्याचे शक्तीप्रदर्शन चालू केले आहे.’ तुर्कस्तान आणि चीन यांच्या या वागण्यावर भारतातील बुद्धीजीवींचे रहस्यमय मौन आश्चर्यचकित करणारे आहे. जी मंडळी दिवस-रात्र अयोध्येतील रामजन्मभूमीवर रुग्णालय, धर्मशाळा इतकेच नाही, तर सार्वजनिक शौचालये उभारण्याचा सल्ला देत होती. हीच मंडळी हागिया सोफियाच्या जागेवर मशीद बनवण्याच्या बळजोरीच्या निर्णयावर मात्र एकदम चिडीचूप आहेत. भारतात नागरी अधिकारांसाठी आवई उठवणारे हाँगकाँगमधील नागरी अधिकारांवरील अतिक्रमणाविषयी मात्र मौन धारण करून आहेत. असे का ?
लोकशाहीतील उदार आणि सौम्य कायद्यांचा व्यवस्थितपणे वापर करून घेणारे तिचे विरोधक !
मूळात जिहादी आणि साम्यवादी दोघेही उदारमतवादी लोकशाहीमध्ये मिळालेल्या अधिकारांचा उपयोग व्यूहरचनेसाठी करत असतात. त्यांची श्रद्धा ना लोकशाहीवर आहे, ना तिने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर आहे. अल्पसंख्यांक अधिकार, महिलांचे अधिकार आणि सहिष्णुता हे सर्व विषय त्यांच्यासाठी श्रद्धेचे नसून व्यूहरचनेची उपकरणे आहेत. ते जोपर्यंत अल्पमतात आहेत, तोपर्यंत ते याचा वापर करतात. ज्या समाजात ते अल्पमतात असतात, तिथे हे आणखी एक सूत्र लावून धरतात, म्हणजेच ते स्वत:ला पीडित असल्याचे दाखवतात. या दोन्ही शक्ती या खेळात तरबेज आहेत. त्यासाठी नुकतीच घडलेली दोन उदाहरणे येथे देणे पुरेसे होईल.
अ. भारतात सध्या कट्टर साम्यवादी वरवरा राव यांच्यावरून सूत्र चर्चिले जात आहे; परंतु वरवरा राव यापूर्वी स्वत:च म्हणाले आहेत की, ‘त्यांचा सशस्त्र क्रांतीवरच विश्वास आहे.’ त्यांचे विचार, त्यांची कृत्ये यांची चर्चा न करता केवळ आता त्याचे अधिक असलेले वय, त्याचे लेखन यांचीच चर्चा त्यांचे समर्थक करू लागले आहेत. जर कायदा सर्वांसाठी समान आहे, तर मग या कार्यकर्ता दिसणार्या लोकांसाठी वेगळी मागणी का म्हणून ? साम्यवादी त्यांच्या सत्ता काळात अशी दयाबुद्धी दाखवतात का ?, हे त्यांना विचारले पाहिजे.
आ. अशीच घटना ब्रिटनमध्ये शमीमा बेगम नावाच्या ‘इसिस’संबंधित जिहादी आतंकवादी महिलेची आहे. मूळ बांगलादेशी असलेली शमिमा ब्रिटीश नागरिक आहे. ती वयाच्या १५ व्या वर्षी सीरियामध्ये पळून जाऊन इस्लामिक स्टेटच्या लढाऊ गटात सामील झाली. ती तिथे आत्मघाती तुकड्यांसाठी स्फोटकांची जॅकेट सिद्ध करायची; परंतु आता तिला ब्रिटनला परत यायचे आहे. ब्रिटनमध्ये तिच्या अधिकारांची चर्चा चालू आहे. तिचा निष्पाप चेहरा एक प्रकारचे ‘पोस्टर’ बनले आहे. शमीमाला असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, जणू ती परिस्थितीने गांजली आहे आणि त्या बिचारीवर पुष्कळ अत्याचार होत आहेत. लोकशाही व्यवस्थेतील उदारता आणि सौम्य कायद्यांचा वापर लोकशाहीचे विरोधक अगदी व्यवस्थितपणे करत आहेत.
धूर्त आणि चलाख असलेले जिहादी अथवा साम्यवादी यांचा बुरखा फाडणे आवश्यक !
जिहादी अथवा साम्यवादी यांना जगात कुठेही सत्ता मिळताच, ते आधी त्यांच्या विरोधकांचे सर्व अधिकार, इतकेच नाही, तर जगण्याचा अधिकारही हिसकावून घेतात. या दोन्हीही विचारसरणी शांतीपूर्ण सहअस्तित्वाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवत नाहीत. उदार असल्याचा बुरखा घालून समाजातील वेगवेगळ्या गटांमध्ये खोलपर्यंत घुसून बसलेले हे लोक सर्वाधिक धोकादायक आहेत. या शक्ती लोकशाही अधिकारांचा उपयोग आतल्या आत तिला दुबळे आणि अंतत: नष्ट करण्यासाठी करत आहेत. त्यांचे मूळ ध्येयच ते आहे. त्यामुळे अशा धूर्त आणि चलाख लोकांचे बुरखे फाडणे अत्यंत आवश्यक आहे.
– उमेश उपाध्याय
(संदर्भ : दैनिक ‘तरुण भारत’, २८ जुलै २०२०)