एस्.टी.च्या संपावर लवकरच तोडगा निघेल ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना
मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाविषयी २३ नोव्हेंबर या दिवशी शरद पवार यांना भेटून या विषयावर चर्चा केली आहे. शरद पवार यांनी संपाविषयी सकारात्मक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे संपाविषयी लवकरच तोडगा निघेल, याची मला खात्री आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत पुढे म्हणाले की, परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांविषयी सर्वांना सहानुभूती आहे. या संपाला राजकीय वळण लागले आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानी आंदोलन करणारे परिवहन महामंडळाचे कर्मचारी नव्हते.
अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन
मागील १६ दिवसांपासून चालू असलेल्या या संपाची तीव्रता वाढू लागली आहे. अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी शाई फेकण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी ५ आंदोलकांना कह्यात घेतले आहे.