सर्वस्व अर्पण करून जनतेसाठी आदर्श निर्माण करणारे नेते !

आपल्या उदाहरणाने सहकारी, शिष्य, प्रजा यांच्यासमोर आदर्श निर्माण करतो, तो नेता ! मध्यंतरी एकदा आकाशवाणीवर एक निवेदन ऐकले. जुन्या काळातील एक अधिकारी आपले अनुभव सांगत होते. मुलाखतकाराने प्रश्न विचारला, ‘सर्वसाधारणपणे एैशोआरामाची, सुखाची, सहज मिळणार्‍या सुविधांची माणसाला चटक असते. आपण वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध आहात. आपल्या वक्तशीरपणाचा सहकार्‍यांना कधी त्रास वाटला का ? किंवा वेळेवर काम करण्याची सवय आपण सहकार्‍यांना कशी लावली ?’ ते अनुभवी अधिकारी म्हणाले, ‘‘लोकांना सांगून ते शिस्त पाळत नाहीत. न बोलता स्वतः काम करून शिकवण्याची एक पद्धत असते. मी पहिल्या दिवशी वरिष्ठ म्हणून कार्यालयात गेलो, तेव्हा कार्यालयाबाहेर फक्त चौकीदार होता. मी पदभार स्वीकारला आणि एक-दोन दिवसांतच माझ्या लक्षात आले की, कार्यालयाची वेळ ८ वाजताची होती; पण त्या वेळी माझ्या आणि चौकीदाराव्यतिरिक्त कुणीच उपस्थित नसे. इतर लोक सावकाश, रमत-गमत ८, ८.१५ वाजता, १० वाजेपर्यंत येत असत. मी कुणाला काहीच बोललो नव्हतो. त्यानंतर ५-६ दिवसांनी मी ७.५५ वाजता कार्यालयात आलो. नेहमीप्रमाणेच चौकीदार दारात बसला होता. त्याने मला विचारले, ‘‘साहेब, आज कुणी पाहुणे येणार आहेत का ?’’ मी म्हटले, ‘‘नाही.’’ ८ वाजून गेल्यानंतर एकेक जण आत येऊ लागला. मी दारातच उभा असलेला पाहून प्रत्येक जण विचारात पडत होता. लागोपाठ ३ दिवस मी हाच नेम पाळला. कुणाशीच काही बोलत नसे. एकटा मीच सर्वांच्या आधी येतो, हे लोकांच्या लक्षात आले होते आणि चौथ्या दिवशी कार्यालयातील सर्व लोक ८ वाजता नव्हे, तर ७.५५ वाजताच उपस्थित राहू लागले. तेव्हापासून आमच्या कार्यालयाची ही शिस्तच झाली आहे. प्रत्येक जण ५ मिनिटे अगोदर उपस्थित असतो.’’

१. मोहनदास गांधी यांनी कनिष्ठ सेवा शिकवणे

मोहनदास गांधी

मोहनदास गांधी तिसर्‍या वर्गाव्यरिरिक्त प्रवास करत नसत. ते मुद्दाम हरिजन वाड्यात मुक्कामाला थांबत. सकाळी सार्वजनिक शौचालय स्वच्छ करत. यातून त्यांनी लोकांना कनिष्ठ सेवा करण्यास शिकवली. अशा अनेक नेत्यांच्या कथा सांगता येतील. वागावे कसे, हे नेता किंवा गुरु आपल्या वागणुकीतून शिकवत असतो. तो स्वतः कष्ट सोसतो आणि दुसर्‍यांना कष्ट करण्याची स्फूर्ती देतो.

२. इंग्लंडचे माजी पंतप्रधान एडवर्ड यांनी निवृत्त झाल्यावर लगेचच निवासस्थान सोडणे

इंग्लंडचे माजी पंतप्रधान एडवर्ड हीथ हे ब्रिटीश पंतप्रधानांच्या निवासस्थानात रहात होते. पंतप्रधानपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधानांचा निवास सोडला. त्यानंतर त्यांनी व्यक्तीगत सामान २-३ मित्रांच्या घरी विभागून पोचवले; कारण एडवर्ड हीथ अविवाहित होते. त्यांच्या नावावर इंग्लंडमध्ये स्वतःचे घर तर सोडाच; पण भाड्याची एक खोलीसुद्धा नव्हती. नंतर सरकारने त्यांना बॅचलर अपार्टमेंट्स मधील एक फ्लॅट (सदनिका) हप्ता पद्धतीने विकत दिला. (याउलट भारतात लोकप्रतिनिधींना सदनिका अथवा बंगला सोडण्यासाठी नोटिसांवर नोटिसा पाठवाव्या लागतात आणि त्या बंगल्याचे भाडे भरण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. ही दुःस्थिती पालटण्यासाठी निःस्वार्थी आणि त्यागी वृत्तीची शासनप्रणाली असलेले हिंदु राष्ट्र हवे ! – संपादक)

३. माजी राष्ट्रपती एस्. राधाकृष्णन् यांनी खासगी कामांत सरकारकडील कागद किंवा लेखणी न वापरणे

माजी राष्ट्रपती एस्. राधाकृष्णन्

भारताचे माजी राष्ट्रपती एस्. राधाकृष्णन् सरकारी नोकरीत असतांना त्यांना सरकारकडून निवासस्थान आणि अनेक सोयी मिळालेल्या होत्या; पण खासगी काम करतांना सरकारकडून मिळालेले कागद किंवा लेखणीही ते वापरत नसत. (भारतातील किती लोकप्रतिनिधी असा आदर्श ठेवतात ? – संपादक)

४. अखंड व्हिएतनामसाठी अध्यक्षीय राजवाड्यात न रहाता झोपडीत रहाणारे डॉ. हो चि मिन्ह !

डॉ. हो चि मिन्ह

उत्तर व्हिएतनामचे नेते डॉ. हो चि मिन्ह यांची गोष्ट वीर नेत्याला शोभण्यासारखीच आहे. उत्तर आणि दक्षिण व्हिएतनामची फाळणी झाली, तेव्हा उत्तर व्हिएतनाम डॉ. मिन्ह यांच्या नेतृत्वाखाली आला आणि दक्षिण व्हिएतनामवर अमेरिकेचा लष्करी प्रभाव होता. तेव्हा डॉ. हो चि मिन्ह यांनी प्रतिज्ञा केली, ‘उत्तर आणि दक्षिण व्हिएतनामची फाळणी रहित होऊन ते दोन्ही एकत्र येईपर्यंत अध्यक्षीय राजवाड्यात रहाणार नाही. झोपडीतच राहीन.’ या प्रतिज्ञेप्रमाणे डॉ. हो चि मिन्ह २० वर्षे म्हणजे मृत्यूपर्यंत झोपडीतच रहात होते. राजवाड्याला जाळ्या आणि कुलपे लावून ठेवली होती. ती उघडलीसुद्धा नाहीत. शेवटी व्हिएतनाम एक झाले. (कुठे उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम एक होण्यासाठी झोपडीत रहाणारे डॉ. हो चि मिन्ह आणि कुठे अखंड भारताचे अनेक तुकडे होऊनही ऐषोआरामात जगणारे भारतातील लोकप्रतिनिधी ! – संपादक)

५. चितोड जिंकेपर्यंत ऐषोआराम न करण्याची प्रतिज्ञा करणारे महाराणा प्रताप !

महाराणा प्रताप

चितोडमधून बाहेर पडतांना महाराणा प्रताप यांनी प्रतिज्ञा केली, ‘‘चितोड जिंकेपर्यंत ऐषोआराम करणार नाही, महालात आणि गादीवर झोपणार नाही. देश स्वतंत्र होईपर्यंत कष्टात किंवा रानावनांत झुंजत राहीन.’’ ती प्रतिज्ञा त्यांनी शेवटपर्यंत पाळली. त्यांची स्मृती म्हणून कित्येक राजपूत आजही भूमीवर झोपतात.

६. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या कामगार आणि बांधव यांची आठवण ठेवणारे नेल्सन मंडेला !

नेल्सन मंडेला

दक्षिण आफ्रिकेतील नेता नेल्सन मंडेला सुटून आले, तेव्हा अनेक देशातील लोकांनी आनंदाचे समारंभ केले. पूर्व लंडनजवळील ‘मर्सिडीज बेन्झ’ या चारचाकी बनवणार्‍या आस्थापनातील कर्मचार्‍यांनी नेहमीच्या कामाव्यतिरिक्त अधिक वेळ काम करून मंडेला यांना देण्यासाठी लाल रंगाची मोटार सिद्ध करून नेल्सन मंडेला यांना भेट म्हणून अर्पण केली. ती स्वीकारतांना मंडेला म्हणाले, ‘‘हा लाल रंग देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात माझ्या देशातील कामगार आणि बांधव यांनी देशासाठी वाहिलेल्या रक्ताची सतत आठवण देईल.’’

७. नेत्यांच्या त्यागपूर्ण आदर्शाने जनता आणि त्यांच्यामध्ये आपुलकीचे नाते निर्माण होणे

नेता किंवा गुरु जेव्हा तन-मन-धनाने त्यागपूर्वक जनता आणि राष्ट्र यांची सेवा करतात, तेव्हा जनताही अशा नेत्याला जनमानसात कीर्तीच्या शिखरावर बसवते. शेकडो, सहस्रो मावळे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्राणांची कुरवंडी करत. टिळक ‘लोकमान्य’ झाले. नेता आणि जनता यांच्यामध्ये परस्पर आपुलकीचे नाते निर्माण होते, ते एकमेकांवरच्या विश्वासाने अन् नेत्यांच्या त्यागपूर्ण आदर्शाने ! अशा वेळी तो नेता फक्त विशिष्ट राष्ट्राचा असतो, असे नाही. तो सर्व जगाचा आदर्श बनलेला असतो. म्हणूनच टिळक, सुभाषचंद्र बोस, सावरकर यांच्या स्मृती अनेक देशांत जागवल्या जातात. एखादा नेता सर्वस्वाने जनतेसाठी काम करतो, तेव्हा त्याच्या गुणांचा सुगंध मानवतेचा मानबिंदू होतो. तो देश कल्याणाच्या सीमा ओलांडून अमरकीर्तीच्या कोशात कोरला जातो.’

(संदर्भ : मनशक्ती, ऑक्टोबर १९९२)