विविध त्रासांवर नामजपादी उपाय अचूक शोधून ते केल्याने त्रास दूर होणे आणि यावरून लक्षात येणारे नामजपादी उपायांचे महत्त्व !

‘नामजपादी उपाय केल्याने साधकांचे त्रास कसे दूर होतात’, याविषयीची लेखमाला !

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘मनुष्याच्या जीवनात येणार्‍या ८० टक्के समस्या या आध्यात्मिक कारणांमुळे आलेल्या असतात. त्यामुळे अशा समस्या सुटण्यासाठी साधना करण्याची आवश्यकता असते. साधनेच्याच जोडीला समस्यांच्या त्या त्या प्रसंगांच्या वेळी त्या त्या समस्येवर नामजपादी उपाय शोधून ते करण्याचीही आवश्यकता असते. सध्या धर्माचरणाचा र्‍हास झाल्याने आलेल्या आपत्काळामध्ये वाईट शक्तींचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे त्यांनी सत्कार्यामध्ये विघ्ने आणून त्रास देण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजाभिमुख सत्कार्य करणार्‍या, म्हणजे समष्टी साधना करणार्‍या सनातनच्या साधकांना सध्या अशा त्रासांची प्रचीती वारंवार येत आहे. त्यामुळे कोणतेही सत्कार्य निर्विघ्नपणे होण्यासाठी आधीच नामजपादी उपाय शोधून ते करावे लागत आहेत. तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रतिदिन करत असलेल्या व्यष्टी साधनेमध्येही साधकांना वाईट शक्ती वारंवार त्रास देत आहेत. त्यासाठीही साधकांना नामजपादी उपाय शोधून ते करावे लागत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लाभलेले मार्गदर्शन आणि कृपा यांमुळे मी साधकांना होत असलेल्या अन् त्यांच्या सेवेत येत असलेल्या आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय शोधण्याची अन् ते काही प्रसंगी करण्याची सेवा गेली काही वर्षे करत आहे. तसेच साधकांच्या वस्तू, रहाण्याच्या वास्तू, देवतांची चित्रे इत्यादींवर होत असलेल्या वाईट शक्तींच्या आक्रमणांवरही नामजपादी उपाय करू शकत आहे. वाईट शक्तींच्या त्रासांवर नामजपादी उपाय करणे म्हणजे त्यांच्याशी एकप्रकारे लढणेच असते. पाचव्या, सहाव्या पाताळांतील वाईट शक्तींची शक्ती पुष्कळ असल्याने त्यांच्याशी लढणे, म्हणजे आपल्या जिवावर बेतण्याएवढे धोकादायक असते, तरीही गुरूंचे संरक्षककवच आणि देवाची कृपा यांमुळेच मी ही सेवा करू शकत आहे. या सेवेतील माझे विविध अनुभव, मला शिकायला मिळालेली सूत्रे, मी नामजपादी उपाय केलेल्या साधकांच्या अनुभूती हे लिखाण या लेखमालेत देत आहे. ‘हे लिखाण वाचून साधना, नामजपादी उपाय आणि गुरुकृपा यांचे जीवनातील महत्त्व सर्वांच्या मनावर बिंबो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.८.२०२१)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा  : https://sanatanprabhat.org/marathi/527151.html


ऑनलाईन नवम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनाच्या कालावधीत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले आणि अडचणी दूर होण्यासाठी केलेले नामजपादी उपाय अन् त्यामुळे झालेले परिणाम !

‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ३०.७.२०२० ते २.८.२०२० आणि ६ ते १०.८.२०२० या कालावधीत ‘नवम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशना’चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. आयोजनाच्या सेवेत विविध स्तरांवर अडथळे येत असल्याचे लक्षात आले. अडथळ्यांमध्ये प्रक्षेपणातील तांत्रिक समस्या, वक्त्यांना जोडण्यात अडचणी येणे, अधिवेशनासाठी आवश्यक असणारी ध्वनीचित्र-चकती ‘अपलोड’ न होणे आदींचा समावेश होता. यामागे आध्यात्मिक कारण असल्यास त्याच्या निवारणार्थ सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय परिणामकारक असल्याने अधिवेशनात येणार्‍या विविध अडथळ्यांवर मात करता आली. १४.११.२०२१ या दिवशीच्या अंकात आपण या लेखमालेतील काही सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

श्री. अरुण कुलकर्णी

४. दिनांक : ८.८.२०२० (षष्ठम दिन)

‘या दिवशी अडथळे नाहीत. उपस्थिती वाढण्यासाठी पुढील उपाय करावेत’, असे सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी सांगितले.

४ अ. उपाय

४ अ १. जप : ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ ।

४ अ २. मुद्रा : आध्यात्मिक उपाय करणार्‍या साधकाने अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावून आज्ञाचक्राच्या समोर १ – २ सें.मी. अंतरावर न्यास करावा आणि ‘ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ ।’ हा जप करावा.

४ अ ३. कालावधी : १ घंटा’

५. दिनांक : ९.८.२०२० (सप्तम दिन)

५ अ. उपाय

५ अ १. जप : निर्गुण

५ अ २. मुद्रा : आध्यात्मिक उपाय करणार्‍या साधकाने एका हाताचा तळवा आज्ञाचक्रासमोर १ – २ सें.मी अंतरावर आणि दुसर्‍या हाताचा तळवा तोंडासमोर १ – २ सें.मी अंतरावर आडवा धरावा अन् ‘निर्गुण’ हा जप करावा.

५ अ ३. कालावधी : २ घंटे

५ अ ४. प्रार्थना : जप करतांना ‘कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडू दे. कार्यक्रमातील उपस्थिती वाढू दे. कार्यक्रमातील अडथळे दूर होऊ दे. ध्वनीमुद्रणातील अडथळे दूर होऊ दे. धर्मप्रसाराचे हे कार्य प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे होऊ दे’, अशी श्रीकृष्णाला प्रार्थना करावी.’

– श्री. अरुण कुलकर्णी, रामनाथी आश्रम, गोवा. (१४.८.२०२०)

(समाप्त)

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आम्हा साधकांना नामजपादी उपायांचे महत्त्व शिकायला मिळत आहे, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी अल्पच आहे.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक