नालासोपारा येथील कथित स्फोटकांच्या प्रकरणात दायित्वशून्य वक्तव्य केल्याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस
‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांची याचिका
मुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – नालासोपारा येथील कथित स्फोटकांच्या प्रकरणात दायित्वशून्य वक्तव्य केल्याच्या प्रकरणी राज्याचे विद्यमान गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. १९ जानेवारी २०२२ या दिवशी न्यायालयात उपस्थित राहून म्हणणे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने आव्हाड यांना दिला आहे. ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी आव्हाड यांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट केली असून २३ नोव्हेंबरला न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपिठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली.
१. वर्ष २०१८ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने नालासोपारा येथील गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या घरी धाड टाकली होती. या धाडीत स्फोटके मिळाल्याचा दावा आतंकवादविरोधी पथकाकडून करण्यात आला होता.
२. यावर जितेंद्र आव्हाड यांनी ‘वैभव राऊत आणि त्याचे २ साथीदार यांच्याकडून आतंकवादविरोधी पथकाने कह्यात घेतलेले जवळजवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब सिद्ध करण्याची सामुग्री मराठा आंदोलनाच्या काळात घातपात करण्यासाठीच होती. यातून महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता’, असे ‘ट्वीट’ केले होते, तसेच याविषयीचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला होता.
३. या प्रकरणाचे अन्वेषण करणारे आतंकवादविरोधी पथक किंवा अन्य अधिकृत अन्वेषण यंत्रणा यांनी अशा प्रकारे कुठेही घोषित केलेले नाही, तसेच या प्रकरणी न्यायालयात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रातही याविषयी कोणताही उल्लेख केलेला नाही; मात्र तरीही आव्हाड यांनी कोणताही संदर्भ न देता हे ‘ट्वीट’ केले.
४. अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी १२ ऑगस्ट २०१८ या दिवशी भाईंदर पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती; मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याने अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी ठाणे येथील जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात तक्रार प्रविष्ट केली होती. या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने निर्णय देतांना आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. या निर्णयाला अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर सुनावणी चालू आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह वक्तव्य !
‘ज्यांना मराठा आंदोलनाची अपकीर्ती करून महाराष्ट्रात अराजकता निर्माण करावयाची आहे, ते हे लोक आहेत. मराठा आंदोलनाची अपकीर्ती करण्यासाठी हे लोक बॉम्बचा वापर करणार होते. समाजात द्वेष निर्माण करण्याचा यांचा प्रयत्न होता. जर कुणा अब्दुलच्या घरात बॉम्ब सापडले असते, तर त्याला १५ मिनिटांत ‘पाकिस्तानी’ ठरवण्यात आले असते. त्याचे नाते हाफीज मोहम्मदसमवेत जोडण्यात आले असते. त्याच्या समर्थनासाठी येणार्यांना आतंकवादविरोधी पथक घेऊन गेले असते’, असे आक्षेपार्ह वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओमध्ये केले असल्याचे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी याचिकेत म्हटले आहे.
दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी आव्हाड यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल, संस्थापक, हिंदु टास्क फोर्स
आव्हाड यांनी व्हिडिओमध्ये हिंदु-मुस्लिम असे वक्तव्य करून आणि ते प्रसारित करून दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात दंडाधिकार्यांनी व्हिडिओ पाहून हे वक्तव्य गुन्हेयुक्त असल्याचे म्हटले होते. हे आम्ही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे उच्च न्यायालयाने आव्हाड यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे.