संयुक्त अरब अमिरातच्या राजकन्येच्या तीव्र विरोधानंतर ‘झी न्यूज’चे राष्ट्रनिष्ठ संपादक सुधीर चौधरी यांना कार्यक्रमातून वगळले !
राजकन्येकडून सुधीर चौधरी यांची ‘असहिष्णु’ आणि ‘आतंकवादी’ अशा शब्दांत हेटाळणी !
|
नवी देहली – संयुक्त अरब अमिरातच्या राजकन्या हेंड बिंत ए फैसल अल् कासिम यांनी केलेल्या विरोधानंतर ‘झी न्यूज’चे संपादक श्री. सुधीर चौधरी यांचे नाव ‘अबू धाबी चार्टर्ड अकाऊंटन्टस’ कार्यक्रमातील वक्त्यांच्या सूचीतून हटवण्यात आले आहे. श्री. सुधीर चौधरी यांच्या या कार्यक्रमातील सहभागावर आक्षेप घेतांना राजकन्या कासिम यांनी श्री. चौधरी यांचा उल्लेख ‘असहिष्णु’ आणि ‘आतंकवादी’ असा केला. त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांकडून चौधरी यांचे नाव हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजकन्या कासिम यांनी श्री. सुधीर चौधरी यांना विरोध करतांना म्हटले की,
एक सूत्रसंचालक रात्रंदिवस मुसलमानांचा अपमान करतो आणि त्यालाच आपल्या देशात बोलण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी बोलावले जाते. सुधीर चौधरी यांच्यावर खोट्या बातम्या देणे, ‘इस्लामोफोबिक’ (इस्लामविषयी द्वेष असलेला) आणि जातीय द्वेष करण्याचा आणि त्यांचा प्रसार करण्याचा आरोप आहे. एका अप्रमाणिक पत्रकाराला मंचावर आणि प्रेक्षकांसमोर आमंत्रित करून आपली प्रतिष्ठा अन् सन्मानाची पातळी खाली घसरवयाला हवी का ? सुधीर चौधरी भारतातील २० कोटी मुसलमानांना लक्ष्य करतात. देशभरात मुसलमानांच्या होणार्या हिंसाचारात त्यांच्या अनेक कार्यक्रमांचे थेट योगदान आहे.