४८ लाख रुपये किमतीच्या मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी
सीमेवरून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी ठोस उपाययोजना काढली जात नाही, तोपर्यंत असेच घडत रहाणार ! – संपादक
कणकवली – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील ओसरगाव येथे २० नोव्हेंबर या दिवशी पहाटे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात कारवाई केली. या कारवाईत पथकाने ४८ लाख रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य आणि १६ लाख रुपयांचा ट्रक, असा एकूण ६४ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी तिघांना येथील न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मद्याच्या अवैध वाहतुकीविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रवि चंद्रकांत जाधव (भिवंडी, ठाणे), नरेंद्र रामसेवक गुप्ता (भिवंडी, ठाणे) आणि सिद्धार्थ मधुकर घोडके (केतकीपाडा, दहिसर, मुंबई) या तिघांना अटक करण्यात आली.