बांदा येथे २० लाख रुपयांच्या मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी एकाला अटक
सातत्याने कारवाई होत असतांनाही मद्याची अवैध वाहतूक करणार्यांना त्याचा धाक वाटत नसेल, तर पोलीस आणि प्रशासन यांनी कारवाईचा अन्य पर्याय शोधला पाहिजे अन्यथा आता चालू असलेली कारवाई हे एक ढोंग ठरेल ! – संपादक
बांदा – गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील एकाला महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २१ नोव्हेंबरला अटक केली. या कारवाईत २० लाख रुपयांचे मद्य आणि मद्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक, असा एकूण ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला. (या जप्त केलेल्या वस्तू पुढे पोलिसांना लाच देऊन सोडवल्या जातात, असाच अनुभव आहे ! त्यामुळे केवळ जप्त करून उपयोग नाही, तर अशी वाहतूक होऊच नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक)
गोवा राज्यातून एका ट्रकमधून मद्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार या विभागाच्या पथकाने सापळा रचून मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली येथील तपासणी नाक्यावर एक ट्रक तपासणीसाठी थांबवला. या वेळी ट्रकमध्ये असलेल्या मालाच्या पोत्यांच्या मागे मद्याचे खोके असल्याचे लक्षात आले.