इयत्ता ७ आणि ८ वीचे प्रत्यक्ष वर्ग २५ नोव्हेंबरपासून चालू करण्यास शासनाची संमती
पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – इयत्ता ७ आणि ८ वीचे प्रत्यक्ष वर्ग २५ नोव्हेंबरपासून चालू करण्यास शासनाने संमती दर्शवली आहे. यासंदर्भातील आदेश २३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक भूषण सावईकर यांनी दिली आहे.
१. शासनाने इयत्ता ९ वीपासून पुढील सर्व वर्ग प्रत्यक्ष घेण्यासाठी काही मासांपूर्वी अनुमती दिली आहे; मात्र इयत्ता पहिली ते इयत्ता ६ वीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष घेण्यासंदर्भात सध्या निर्णय घेण्यात आलेला नाही.
२. राज्यात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण बर्याच प्रमाणात उणावल्याने शासन नियुक्त ‘कोविड-१९ कृती दल’ आणि तज्ञ आधुनिक वैद्यांचा सहभाग असलेली समिती यांनी पूर्वप्राथमिकपासून पुढील सर्व वर्ग २२ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष घेण्याची शिफारस शासनाकडे केली होती.
३. शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शालेय वर्ग प्रत्यक्ष चालू करण्याचा निर्णय शाळांचे व्यवस्थापन, पालक-शिक्षक संघ, राजकीय पक्ष आदींना विश्वासात घेऊनच घेतला जाणार असल्याचे म्हटले होते.
४. तज्ञ समितीने शिफारस केल्यानंतर ग्रामीण भागांतील काही विद्यालयांनी इयत्ता ८ वीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग चालू केल्याचे वृत्त आहे. आठवड्यातून ३ दिवस आलटून पालटून हे वर्ग चालू आहेत.
५. काणकोण येथील निराकार विद्यालय आणि मांद्रे येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्था यांनी प्रत्यक्ष वर्गांना प्रारंभ केल्याचे वृत्त आहे.