परीक्षा देण्यासाठी बनावट (डमी) विद्यार्थ्याला बसवले !
पोलीस भरती परीक्षेत अपप्रकार !
मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीमुळे दिवसेंदिवस मुले संस्कारहीन बनत आहेत. बनावट विद्यार्थी परीक्षेला बसवण्याचे प्रकार वारंवार घडणे, हे शिक्षणक्षेत्राला लज्जास्पद आहे. दोन्ही विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा केल्यासच असे प्रकार थांबतील. – संपादक
पिंपरी (जिल्हा पुणे) – पोलीस भरतीसाठी झालेल्या लेखी परीक्षेत बनावट विद्यार्थी बसवण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुख्य परीक्षार्थी आणि बनावट उमेदवार यांना पोलिसांनी कह्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही उमेदवारांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ही घटना बावधन परिसरातील अरिहंत इन्स्टिट्यूट परीक्षा केंद्रावर घडली. प्रकाश धनावत असे मुख्य परीक्षार्थीचे, तर मुनाफ हुसेन बेग असे बनावट परीक्षार्थीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ७२० पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरती पूर्व परीक्षा शुक्रवारी झाली. त्या वेळी ही घटना घडली. तोंडवळ्यातील साधर्म्यामुळे बनावट परीक्षार्थी परीक्षा केंद्रात येऊ शकला. पोलीस उपनिरीक्षक काकडे यांना बनावट परीक्षार्थी परीक्षेसाठी बसवण्यात आल्याची माहिती मिळाली. या घटनेची निश्चिती केल्यानंतर पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.