संतांच्या विचारांमुळे महाराष्ट्रात वैचारिक प्रगल्भता ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
पारनेर (जिल्हा नगर) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचे संत निळोबाराय पाईक होते. राज्याला संत विचारांची मोठी परंपरा आहे. या संत विचारांनीच महाराष्ट्राची भूमी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ केल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पिंपळनेर (पारनेर, जिल्हा नगर) येथे संत निळोबाराय यांच्या ‘अभंग गाथे’चे प्रकाशन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या काळातही पालखी सोहळ्याची परंपरा अखंड राखण्यासाठी वारकरी संप्रदायानेही सहकार्याची भूमिका घेतली त्याविषयी त्यांचे धन्यवाद मानतो, असे म्हणून पिंपळनेर येथील वाड्याचा जिर्णोद्धार आणि सभामंडप यांसाठी राज्य सरकारने ५० लाखांचा निधी घोषित केल्याचे पवार यांनी सांगितले.