महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी विदेशी साधिकांना आलेल्या अनुभूती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या विदेशी साधिकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

१८ ते २५.७.२०२१ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले साधक, आध्यात्मिक त्रास असलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, असे एकूण १८ साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे ऐकवण्यात आला. त्या वेळी प्रयोगात सहभागी झालेल्या काही विदेशी साधिकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.


परात्पर गुरु डॉ. आठवले

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप करण्याचे महत्त्व !

‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते, तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप अखंड केले, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’

संत आणि साधक यांना मिळालेले सूक्ष्म ज्ञान आणि साधकांना आलेल्या अनुभूती यांतील साम्य !

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप केल्यावर काय अनुभूती येतात, याची माहिती सद्गुरु गाडगीळ आणि सूक्ष्म ज्ञान प्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी सांगितली आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे चांगल्या अनुभूती बहुतेक साधकांना आल्या आहेत, हे येथील लिखाणावरून लक्षात येईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


१. आध्यात्मिक त्रास असलेली आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळीची एक साधिका

१८.७.२०२१

चांगल्या अनुभूती

१. ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप माझ्याकडून सहजतेने होत होता आणि तो करतांना माझे मन सहजतेने एकाग्र झाले.

२. ‘माझ्या देहातील त्रासदायक शक्ती धुराप्रमाणे, तसेच कणांच्या स्वरूपात बाहेर येत आहे’, असे मला जाणवले. मला माझ्या शरिराच्या आत आणि बाहेर गारवा जाणवत होता. माझ्या हातांच्या तळव्यांतून माझ्यावर उपाय होत असल्याने मला माझ्या हातांच्या तळव्याच्या मध्यभागी उष्णता जाणवत होती, मात्र माझ्या हातांची बोटे थंड होती.

३. ‘हा नामजप तारक असून सगुण-निर्गुण स्तरावरील आहे’, असे मला जाणवले.

४. नामजपातील शक्ती वर्तुळाकारात माझ्याभोवती निर्माण झाली असून नामजपामुळे मला आध्यात्मिक लाभ होत असल्याचे जाणवले.

कु. तेजल पात्रीकर

१९.७.२०२१

चांगल्या अनुभूती

१. आज नामजप ऐकतांना मला चांगले वाटत होते, तसेच ‘हा नामजप ऐकतच रहावा’, असे मला वाटत होते.

२. मला असणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे मला बरेच दिवस ना भावस्थिती अनुभवता येत होती, ना ईश्वराचे अस्तित्व अनुभवता येत होते. हा नामजप ऐकतांना मला या दोन्ही स्थिती अनुभवता आल्या.

३. मला गारवा जाणवत होता, तसेच माझे आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र या स्थानी संवेदना जाणवत होत्या. मला शांत वाटत होते. नंतर मी हळूहळू ध्यानावस्थेत गेले.

२०.७.२०२१

चांगल्या अनुभूती

१. नामजप ऐकतांना मला सकारात्मक शक्ती जाणवत होती. ही शक्ती माझ्या षड्चक्रांत प्रवाहित होत असून त्यामुळे मला चैतन्य मिळत असल्याचे जाणवत होते.

२. माझे मन निर्विचार झाले आणि ते एकाग्र झाले होते. मला आतून पुष्कळ शांत वाटत होते.

३. नामजप ऐकतांना मला होत असलेला आध्यात्मिक त्रास न्यून झाला.

२२.७.२०२१

१. त्रासदायक अनुभूती

नामजप ऐकतांना मला माझ्या डोक्याभोवती दाब जाणवत होता आणि मला नामजपावर लक्ष केंद्रित करता येत नव्हते.

२. चांगल्या अनुभूती

अ. मला त्रास देणार्‍या मोठ्या वाईट शक्तीचे स्थान माझ्या मानेभोवती असल्याने मानेभोवती, तसेच माझ्या आज्ञाचक्रस्थानी चैतन्य मिळत असल्याचे जाणवत होते.

आ. मला माझ्या देहात पुष्कळ उष्णता जाणवत होती. त्यामुळे या नामजपातून मला आध्यात्मिक लाभ होत असल्याचे माझ्या लक्षात आले.

इ. माझ्या सभोवताली, तसेच वातावरणात सूक्ष्मातून युद्ध चालू असल्याचे मला जाणवले.

२५.७.२०२१

चांगल्या अनुभूती

१. नामजपातील शक्ती प्रथम माझे मणिपूरचक्र, नंतर अनाहतचक्र, विशुद्धचक्र आणि त्यानंतर आज्ञाचक्र या स्थानी प्रवाहित होत असल्याचे जाणवले. त्यामुळे ही चक्रे कार्यरत झाली. परिणामी मला होत असलेला आध्यात्मिक त्रास न्यून झाला.

२. नामजप ऐकतांना मला चांगले वाटत होते, तसेच काही प्रमाणात भावस्थितीही अनुभवता आली.

३. या प्रयोगानंतर माझा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप आपोआप होऊ लागला.’

सौ. देवयानी होर्वात

२. आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका सौ. देवयानी होर्वात, स्कॉटलँड

२०.७.२०२१

चांगल्या अनुभूती

१. ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ऐकत रहावा’, असे मला वाटत होते. नामजप ऐकतांना मला हलके वाटत होते, तसेच ‘माझ्याकडे पांढरा प्रकाश प्रवाहित होत आहे’, असे जाणवले. नामजप ऐकतांना मला भाव आणि प्रीती जाणवत होती.

२. नामजप ऐकतांना माझ्या देहाभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण त्वरित न्यून होत असल्याचे मला जाणवले.

३. आज दिवसभर माझ्या विचारांमध्ये सुस्पष्टता नव्हती. नामजप ऐकतांना ती सुस्पष्टता आली.

४. आरंभी माझ्या मनात पुष्कळ विचार असल्याने नामजप ऐकतांना माझे मन एकाग्र होत नव्हते; परंतु मी जसजसा नामजप ऐकू लागले, तसतसे मला चांगले वाटू लागले. ‘मी नामजपात खोलवर जात आहे’, असे मला जाणवत होते.

५. नामजप ऐकवण्याचे थांबवले, तेव्हा मी नामजपात गढून गेले होते. मी त्या अवस्थेतून एकदम बाहेर आले आणि मला मळमळल्यासारखे होऊ लागले.

२१.७.२०२१

चांगल्या अनुभूती

१. ‘नामजप ऐकतांना आरंभी माझ्या मनात दिवसभर माझ्याकडून झालेल्या चुकांविषयी विचार येत होते. माझ्या मनातील विचारांमुळे मला नामजपावर लक्ष केंद्रित करता येत नव्हते. माझ्या मनात अनावश्यक विचार येत असल्याची मला जाणीव झाली आणि मी नामजपावर लक्ष केंद्रित केले.

२. मला पुष्कळ हलके वाटत होते, तसेच ‘नामजपामुळे माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण होत आहे’, असे मला जाणवले.

३. नामजप ऐकल्यानंतर मला सकारात्मक वाटू लागले.

२२.७.२०२१

१. त्रासदायक अनुभूती

अ. ‘आज माझ्या मनाची स्थिती सकारात्मक होती; परंतु ‘माझ्या मनातील मायेतील विचार, तसेच मनोराज्यात रमणे’, यांमुळे माझे लक्ष नामजपावर केंद्रित होत नव्हते.

२. चांगल्या अनुभूती

अ. जेव्हा माझ्या मनाची स्थिती चांगली नसते, तेव्हा माझ्या मनात नकारात्मक विचारांचे प्रमाण अधिक असते. असे असले, तरी आज मला नामजपावर सहजतेने लक्ष केंद्रित करता येत होते. मी काहीशी ध्यानावस्थेत गेले होते.

आ. आज नामजप ऐकतांना मला चैतन्य मिळत असल्याचे जाणवत होत होते, तसेच नामजपामुळे मला आतून शांत वाटत होते.

इ. प्रयोग वेळेत संपला; मात्र आज प्रयोगाच्या वेळी मला वेळेचे भान नसल्याने ‘प्रयोग वेळेच्या आधीच संपला’, असे मला वाटले.’

संकलक : कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (२१.८.२०२१)

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप ऐकतांना जाणवलेली तुलनात्मक सूत्रे

१. ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ऐकतांना मला सकारात्मक आणि शांत वाटत होते. ‘ॐ निर्विचार ।’ या नामजपापेक्षा मला ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ऐकतांना अधिक चांगले वाटत होते.

२. ‘निर्विचार’ आणि ‘ॐ निर्विचार’ या नामजपांच्या तुलनेत ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप साधक सहजतेने करू शकतील, तसेच या नामजपातील शक्तीही साधक सहन करू शकतील’, असे मला वाटले.

३. ‘निर्विचार’ या नामजपात उच्च स्तरीय शक्ती असून ती केवळ संत आणि सद्गुरु, तसेच आध्यात्मिक त्रास नसलेले साधक यांनाच सहन होऊ शकते. त्यामुळे ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करणे सर्वांना सोपे असून यातून अधिकाधिक लाभ होऊ शकतो.’

– आध्यात्मिक त्रास असलेली ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळीची एक विदेशी साधिका (१८.७.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.