‘विश्व फाऊंडेशन’च्या वतीने केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट; शिवपुरीला भेट देण्याचे गडकरी यांचे आश्वासन !
नागपूर, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – शिवपुरी येथील ‘विश्व फाऊंडेशन’च्या वतीने परमसद्गुरु गजानन महाराज यांच्या पादुकादर्शन आणि अग्निहोत्रप्रचार दौरा चालू आहे. या दौर्याच्या निमित्ताने ‘विश्व फाऊंडेशन’च्या वतीने सौ. सीमा मोहन जोशी यांच्या प्रयत्नाने २१ नोव्हेंबर या दिवशी नागपूर येथे केंद्रीय परिवहनमंत्री श्री. नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी सौ. कांचन यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी श्री. अनंत ब्रह्मे आणि उपस्थित साधक यांनी गुरुपरंपरा, पादुका दौरा, ‘विश्व फाऊंडशन’चे कार्य, अग्निहोत्र यांसंबंधांची माहिती दिली. संपूर्ण माहिती ऐकल्यावर श्री. गडकरी यांनी अक्कलकोट येथे भेट देणार, तेव्हा शिवपुरीला भेट देण्याचे आश्वासन दिले.
या वेळी ‘विश्व फाऊंडेशन’च्या वतीने श्री. गडकरी यांना स्वामी पिठाच्या माहितीचे पुस्तक, ‘विश्व फाऊंडेशन’ आणि गुरुमंदिराचे अध्यक्ष पू. (डॉ.) पुरुषोत्तम राजीमवाले यांनी लिहिलेले ‘न्यू एरा’ हे पुस्तक भेट देण्यात आले. सौ. कांचन गडकरी यांना अग्निहोत्राची माहिती दिल्यावर त्यांनी ‘मी पूर्वी अग्निहोत्र करत असे. आता व्यापामुळे जमत नाही; मात्र यापुढील काळात मी परत अग्निहोत्र करण्याचा प्रयत्न करीन’, असे सांगितले. या प्रसंगी सौ. रेखा वझे, सौ. सुचिता बेलसरे, श्री. प्रतिक जरीपटके उपस्थित होते.
श्री. नितीन गडकरी यांना माहिती देतांना श्री. अनंत ब्रह्मे म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीमधील वेद-संस्कृती यांच्या प्रचाराचे कार्य ‘विश्व फाऊंडेशन’च्या वतीने चालू आहे. श्री. गडकरी यांचा विभाग पर्यावरणाच्या संदर्भातील जे कार्य करते, तेच कार्य वेगळ्या प्रकारे ‘फाऊंडेशन’च्या वतीने आम्ही करत आहोत. अग्निहोत्राचा प्रसाराचे हे कार्य राष्ट्र-धर्म कार्य असून आपणही यात सहभागी व्हावे.’’ |