कोल्हापुरात ‘टी.ई.टी.’च्या काही परीक्षा केंद्रांवर गोंधळ; विलंबाने आलेल्यांना प्रवेश नाकारला !
कोल्हापूर – महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने २१ नोव्हेंबर या दिवशी राज्यभर शिक्षक पात्रता परीक्षा (‘टी.ई.टी.’) आयोजित करण्यात आली होती. ‘एस्.टी.’च्या संपामुळे काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी नियोजित वेळेत पोचू शकले नाहीत. काही ठिकाणी २ मिनिटे विलंब झालेल्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी-पालक आणि परीक्षा केंद्रावरील अधिकारी यांच्यात हमरी-तुमरी झाली, यामुळे काही परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला. या वेळी पोलिसांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. (ही समस्या सामंजस्याने न सोडवता विद्यार्थी-पालक आणि अधिकारी यांनी हमरी-तुमरीवर येणे गंभीर आहे. – संपादक)
कोल्हापूर जिल्ह्यातील ३३ केंद्रांवर ही परीक्षा झाली. ‘टी.ई.टी.-१’ साठी ८ सहस्र ७३१, तर ‘टी.ई.टी.-२’ साठी ८ सहस्र ८७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सकाळी १०.३० वाजता परीक्षा चालू झाली. परीक्षा चालू होण्याच्या अगोदर ३० मिनिटे उपस्थित रहाण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या; मात्र ‘एस्.टी.’च्या संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून केंद्रावर उपस्थित रहावे लागले. असे असले तरी ‘अगदी २ ते ५ मिनिटे विलंब झालेल्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला’, असे विद्यार्थी आणि पालक यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले.
या संदर्भात ‘टी.ई.टी.’ परीक्षा घेणारे परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणाले, ‘‘ही परीक्षा चाकरीच्या संदर्भातील असल्याने उमेदवारांनी वेळेत देणे बंधनकारक आहे. त्यामुळे विलंबाने येणार्यांना प्रवेश देता येणार नाही.’’ |