आकाशतत्त्वाच्या (इंटरनेटच्या) माध्यमातून प्रभावीपणे अध्यात्मप्रसार करवून घेणारे महान परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘योगमार्गावरील साधक ‘पिपिलिका मार्ग’, ‘मर्कट मार्ग’ किंवा ‘विहंगम मार्ग’ अशा प्रकारे साधनापथावर वाटचाल करत असतो. ‘पिपलिका मार्ग’, म्हणजे मुंगीचा मार्ग, जी झाडाच्या बुंध्यापासून हळूहळू चालत शेंड्यापर्यंत, म्हणजे ध्येयापर्यंत पोचते. ‘मर्कट मार्ग’ म्हणजे माकड जसे उड्या मारत ध्येयापर्यंत पोचते आणि ‘विहंगम’ म्हणजे पक्षाप्रमाणे उडत ध्येयापर्यंत पोचणे. एखाद्या आध्यात्मिक संस्थेच्या वतीने होणारा अध्यात्मप्रसारही या ३ मार्गांनी होतो.
१. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या साधनामार्गानुसार साधना करणे’, हा साधनेत जलद आध्यात्मिक उन्नती करण्याचा विहंगम मार्ग असणे
ज्ञानयोग, कर्मयोग (ध्यानयोग, हठयोग) आणि भक्तीयोग या सर्वांचा समावेश असलेला ‘गुरुकृपायोग’ हा सुंदर साधनामार्ग परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिला आहे. ही शिकवण वर्ष १९९८ ते २००० या काळात साधनेत आलेल्या आम्हा साधकांना त्या वेळी प्रसारासाठी विदर्भात आलेले सनातनचे साधक देत असत. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी निर्मिलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना करणे, हा साधनेत जलद प्रगती करण्याचा विहंगम मार्ग आहे’, असेही ते साधक सांगायचे. आम्ही साधनेत नवीन असल्याने आम्हाला त्याचा अर्थबोध होत नसे; पण आम्ही (साधक) समाजात प्रसार करतांना त्या शब्दांचा वापर करायचो.
२. कोरोनारूपी संकट येईपर्यंत संस्थेचे कार्य विहंगम मार्गाने निरंतर वाढणे, कोरोना महामारीच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने होणारा अध्यात्मप्रसार पंचमहाभूतांपैकी सर्वांत सूक्ष्म अशा आकाशतत्त्वाच्या माध्यमातून प्रभावीपणे होणे
आरंभापासून ते कोरोनारूपी संकट येईपर्यंत संस्थेचे कार्य विहंगम मार्गाने निरंतर वाढतच होते; पण ‘विहंगम मार्ग’ या शब्दांचा आम्हाला विसर पडला. मागील वर्षापासून कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी लागू झाल्याने ‘घरी राहून प्रसार कसा होणार ?’, हा प्रश्न साधकांच्या मनात येण्यापूर्वीच ‘विहंगम’ नव्हे, तर त्याच्याही पुढील गतीने प्रसार होत आहे’, असे आज अनुभवायला येत आहे. आज सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे अध्यात्मप्रसार, धर्मप्रसार अन् हिंदूंचे संघटन, हे कार्य ‘इंटरनेट’च्या माध्यमातून प्रभावीपणे आणि जलद गतीने होत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘आता होत असलेला धर्मप्रसार पंचमहाभूतांपैकी सर्वांत सूक्ष्म अशा आकाशतत्त्वाच्या माध्यमातून होत आहे. समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसार करायला साधकांना कितीतरी वर्षे लागली असती; पण आकाशतत्त्वाच्या मार्गाने प्रसार अल्प कालावधीत आणि अधिक प्रभावीपणे होत आहे.’’
३. दळणवळण बंदीचा काळ साधकांना साधनेसाठी संपत्काळ !
दळणवळण बंदीच्या कालावधीत साधकांचा ‘आम्ही प्रसार करतो’, हा अहं अल्प झाला. या काळात साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होत आहे अन् समाजातील व्यक्तीही मोठ्या प्रमाणात साधनेकडे वळत आहेत. ‘समाजाला साधनेकडे वळवण्यासाठी आणि साधकांची साधना जोमाने होण्यासाठी ‘कोरोना’ या महामारीचे निमित्त झाले हे नियोजन ईश्वराचेच आहे’, असे मला वाटते.
३ अ. साधकांना झालेले लाभ !
१. प्रसारासाठी बाहेर जाण्याच्या वेळेची बचत होत असल्यामुळे साधकांची शारीरिक ऊर्जा वाचली.
२. वेळेची बचत होत असल्याने साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे अन् भावजागृतीचे प्रयत्न करणे यांत वाढ झाली.
३. अल्पशिक्षित साधकांना भ्रमणभाष सुलभतेने हाताळता येऊ लागला.
४. काही साधकांना त्यांच्या कुटुंबियांकडून होत असलेला विरोध साधक घरी राहून सेवा करत असल्याने अल्प झाला आणि त्यांची कुटुंबियांशी जवळीक वाढली.
५. साधक नामजपादी उपाय गांभीर्याने करू लागले.
३ आ. समाजातील व्यक्तींना होत असलेले लाभ !
१. केवळ भ्रमणभाषच्या माध्यमातून क्षणात सहस्रो किलोमीटर दूर असलेल्या हिंदूंमध्ये सुलभतेने आणि प्रभावीपणे प्रसार होत आहे.
२. समाजातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात साधनेकडे वळत आहेत आणि त्यांच्या मनात राष्ट्र अन् धर्म यांविषयी प्रेम निर्माण होत आहे.
३. हिंदूंचे संघटन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्र्रा’च्या स्थापनेत एकेक पाऊल पुढे पडत आहे.
४. एके काळी ‘हिंदु राष्ट्र्र’ हा शब्द उच्चारणे अशक्य असतांना आज हा शब्द समस्त हिंदूंच्या मुखात अभिमानाने येत आहे.
५. विविध ठिकाणच्या हिंदूंना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा आधार वाटत आहे.
साधक आणि धर्मप्रेमी यांना घरोघरी प्रसार करण्याच्या स्थूल मार्गातून सूक्ष्म अशा आकाशतत्त्वाच्या माध्यमातून प्रसार करायला शिकवणार्या गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. गुरुमाऊलीने सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणांवर कृतज्ञताभावाने समर्पित करतो.’
– (पू.) अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०२१)