नळदुर्ग (जिल्हा धाराशिव) येथील श्री खंडोबा मंदिराकडे जाणार्या रस्त्याची दुरुस्ती करा !
खंडोबा भक्त आणि नागरिक यांची निवेदनाद्वारे मागणी
अशी मागणी भक्तांना निवेदनाद्वारे का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ? – संपादक
नळदुर्ग (जिल्हा धाराशिव) – मैलापूर येथे १६, १७ आणि १८ जानेवारी २०२२ या कालावधीत श्री खंडोबाची यात्रा भरते. या यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंदिराकडे जाणार्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी नळदुर्ग शहरातील नागरिक आणि खंडोबाचे भक्त यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. सोलापूर-भाग्यनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून अर्ध्यावरच रखडत पडले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, श्री खंडोबाच्या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांतील ६ ते ७ लाख भाविक येतात. या सर्व भाविकांना याच मार्गावरून मंदिराकडे जावे लागते. महामार्गाच्या कामात महामार्ग ते मंदिराकडे जाणार्या रस्त्याची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. मध्यंतरी महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदाराने महामार्ग ओलांडून मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर खडी आणि मुरूम टाकून वरवर दुरुस्ती केली; मात्र सध्या हा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. या रस्त्यावरून व्यवस्थित चालतही जाता येत नाही.