ईश्वरी गुणांमुळे सर्वांच्या आवडत्या बनलेल्या आणि असह्य वेदना शांतपणे सहन करून शेवटपर्यंत नामजप करणार्या कुडाळ येथील (कै.) सौ. विनया राजेंद्र पाटील !
ईश्वरी गुणांमुळे सर्वांच्या आवडत्या बनलेल्या आणि असह्य वेदना शांतपणे सहन करून शेवटपर्यंत नामजप करणार्या कुडाळ येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. विनया राजेंद्र पाटील !
कुडाळ येथील सौ. विनया राजेंद्र पाटील यांचे २५.३.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांनी मृत्यूत्तर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. त्यांची मोठी बहीण सौ. पल्लवी पेडणेकर यांना कै. विनया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सर्वांची आवडती
‘आमचे नातेवाईक आणि साधक यांना विनयाचा स्वभाव आवडायचा. तिच्यातील ईश्वरी गुणांमुळे तिचा सहवास नेहमी हवाहवासा वाटायचा. ती आमच्या घरी आल्यावर घरातील वातावरण चैतन्यमय व्हायचे.
२. सहनशील
विनयाने आयुष्यात पुष्कळ शारीरिक आणि मानसिक यातना सहन केल्या. तिने स्वतःचे दुःख इतरांना जाणवू दिले नाही. शेवटच्या १५ दिवसांत तिला असह्य वेदना होत होत्या; पण त्या ती शांतपणे सहन करण्याचा प्रयत्न करत होती. मला शेवटचे २ दिवस तिचा सहवास मिळाला. तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. तिला पुष्कळ अशक्तपणा आला होता. त्यामुळे तिला स्वतःचे काहीच करायला जमत नव्हते. त्या अवस्थेत देवाने माझ्याकडून तिची थोडीफार सेवा करवून घेतली, यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
३. आध्यात्मिक सखी
विनया माझी लहान बहीण असली, तरी आम्ही दोघी एकमेकींच्या चांगल्या आध्यात्मिक मैत्रिणी होतो. आम्ही दोघी एकमेकींशी मनमोकळेपणाने बोलायचो. आम्ही एकमेकींना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविषयी विचारायचो. ईश्वराने आमच्याकडून करवून घेतलेल्या प्रयत्नांविषयी आमचे एकमेकींना सांगणे व्हायचे आणि झालेल्या प्रयत्नांविषयी आमच्याकडून कृतज्ञता व्यक्त व्हायची.
४. विनयाला आजारपणात असह्य वेदना होत असूनही तिचा शेवटपर्यंत ‘श्रीकृष्ण’आणि ‘परम पूज्य डॉक्टर’ असा नामजप सतत चालू होता.
‘अशा ईश्वरी गुण असलेल्या विनयाला पुढची गती मिळून तिची पुढील आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होवो’, ही गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. पल्लवी पेडणेकर, सावंतवाडी (३.४.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक