नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अभीरक्षक डॉ. संतोष यादव यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवरायांच्या काळातील अनेक नोंदींचे पत्र उजेडात !

नगर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची नोंद तसेच राज्याभिषेक आणि मृत्यूची नोंद असलेले अप्रकाशित मोडी लिपीतील पत्र प्रकाशात आले आहे. नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अभीरक्षक आणि मोडी लिपीचे अभ्यासक डॉ. संतोष यादव यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. पुण्याच्या सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्याकडील मोडी कागदपत्रांचा संग्रह नुकताच अनुपमा मुजुमदार यांनी सुपूर्द केला होता, त्यातून हे पत्र प्रकाशात आले आहे.

डॉ. यादव यांनी सांगितले की, या पत्रामध्ये छ. शाहू महाराज राज्यारुढ झाले, वैकुंठगमन ही नोंद, तसेच बाळाजी बाजीराव ‘पेशवाई’ कधी करू लागले, मृत्यू कधी झाला, नारायणराव पेशवे यांनी ९ मास राज्य केले, आबाजी त्र्यंबक यास दिवाणीच वस्त्र दिले. छ. शिवाजी महाराज यांचा जन्म शके १५४९ (वर्ष १६२७), पट्टाभिषेक (राज्याभिषेक) शके १५९६ (वर्ष १६४७), मृत्यू शके १६०२ (वर्ष १६८०) अशा मोडीतील नोंदी आढळून आल्या आहेत. मोडी लिपीतील पत्र वर्ष १८०० ते १८५० च्या कालावधीत लिहिलेले असावे. यातील सर्व नोंदी पडताळल्या असता, त्या नोंदी योग्य आहेत.