अमरावती येथील संचारबंदीमुळे ६ दिवसांपासून बाजार समिती बंद !
अमरावती – काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये केवळ अत्यावश्यक दुकानांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या ६ दिवसांपासून बंद आहे. याचा फटका जिल्ह्यातील शेतकर्यांना बसत आहे. सध्या रब्बी हंगाम चालू आहे. या हंगामासाठी शेतकर्यांना पैशांची आवश्यकता आहे; परंतु बाजार समितीच बंद असल्याने सोयाबीन, तसेच अन्य शेतमाल विकावा तरी कुठे ?, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्यामुळे ‘तात्काळ बाजार समिती चालू करावी’, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकर्यांनी केली आहे.