‘लोकमान्य’रूपी ठेवा !
संपादकीय
संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती,
राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती,
गाऊ त्यांना आरती । गाऊ त्यांना आरती ।।
ही कविता आहे ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांची ! राष्ट्राप्रती त्याग करणार्या आणि बलीदान देणार्या थोरांचा गुणगौरव या कवितेतून महाराष्ट्र कवींनी केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी त्याग केला, त्यांच्या त्यागाचा भावी पिढीला विसर पडू नये, या भावनेतून कदाचित् कवींनी ही कविता केली असावी. दुर्दैवाने अशा थोर पुरुषांच्या आठवणी पुसण्याचे काम स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या शासनकर्त्यांनीच केले. त्यामुळे देशवासियांनाही या राष्ट्रपुरुषांचा विसर पडायला लागल्यास नवल ते काय ? ‘ब्रिटीश साम्राज्य म्हणजे भारतावरील कृपा’, असे म्हणणारा स्वाभिमानशून्य वर्ग वळवळू लागला असतांना त्या वेळी पाय रोवून एक नेता उभा राहिला आणि म्हणाला, ‘कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले, तरी त्यावर पाय ठेवून मी उभा राहीन !’ तो थोर नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ! ब्राह्म आणि क्षात्र तेज यांचा विलक्षण संगम असलेला भारतातील एकमेवाद्वितीय, अशी ज्यांची ओळख करून देता येईल, असा हा नेता; पण या थोर नेत्याची देशात उपेक्षा झाली. एकीकडे गांधी-नेहरू यांच्या नावांची भव्य स्मारके देशात उभी आहेत; मात्र दुसरीकडे ज्या नेत्याने स्वातंत्र्याचा पाया भक्कम केला, त्या लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आणि मृत्यूस्थान आजही दुर्लक्षित आहे.
रत्नागिरी येथील टिळक आळी येथील लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान सध्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. २३ जुलै १८५६ या दिवशी तेथे लोकमान्यांचा जन्म झाला आणि १ ऑगस्ट १९२० या दिवशी मुंबईतील कफ परेड येथील ‘सरदारगृह’ या वास्तूमध्ये त्यांचे निधन झाले. सरदारगृहामध्ये आजही लोकमान्यांनी चालू केलेल्या ‘केसरी’ या वृत्तपत्राचे कार्यालय आहे. या वास्तूमध्ये लोकमान्य टिळक वापरत असलेली पगडी आणि त्यांचे उपरणे संग्रही ठेवण्यात आले आहे. सरदारगृह ही इमारत एका खासगी व्यावसायिकाने विकत घेतली आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर केसरीचे कार्यालय आहे. स्वातंत्र्याच्या काळात हे कार्यालय म्हणजे देशकार्याचे केंद्रबिंदू होते. ब्रिटिशांच्या विरोधातील अनेक क्रांतीकार्याच्या योजना या कार्यालयातच झाल्या. ब्रिटिशांना ‘सळो कि पळो’ करून सोडणारे केसरीतील अग्रलेख याच ठिकाणी लिहिले गेले. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक थोरपुरुषांच्या पदस्पर्शाने ही वास्तू पावन झाली आहे. केसरीच्या या कार्यालयातच लोकमान्य टिळकांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या सहस्रावधींच्या जनसमुदायाचे छायाचित्र आजही तेथे पहायला मिळते. टिळकांच्या कार्याची ओळख करून देणारी ही वास्तू खरेतर सरकारला जतन करता आली असती. त्यांचे राष्ट्रकार्य या वास्तूमधून सरकारला भावी पिढीसमोर ठेवता आले असते; मात्र तसे झाले नाही. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, याची केवळ घोकमपट्टीच विद्यार्थ्यांना देण्यात आली. या थोर पुरुषाचे कार्य त्यांच्या स्मारकातून भावी पिढीसमोर प्रभावीपणे संक्रमित करता आले असते; मात्र काँग्रेसने ते केले नाही.
देशाला गांधी आणि नेहरू यांच्या नावाची ओळखही नव्हती, तेव्हा देशातील क्रांतीकार्याची धुरा या धुरंधर नेत्याच्या खांद्यावर होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या जहाल आणि मवाळ अशा दोन्ही गटांना आपला वाटणारा हा नेता. एकीकडे महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थीदशेत लंडनमध्ये ज्या घरामध्ये रहात होते, ते घर वर्ष २०१६ मध्ये ३.१ दशलक्ष पौंड एवढे मूल्य देऊन खरेदी केले आहे. या वास्तूमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्याची प्रक्रिया चालू आहे. दुसरीकडे मात्र लोकमान्य टिळक यांचे वास्तव्य असलेली आणि त्यांचे निधन झालेली वास्तू दुर्लक्षित आहे. या वास्तूला सरकारने अधिग्रहित करून हे राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, यासाठी भाजपचे नेते राज पुरोहित मागील अनेक वर्षांपासून सरकारकडे मागणी करत आहेत; मात्र सरकारने त्याकडेही दुर्लक्ष केले.
मोहनदास गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत असतांना घातलेला चष्मा वर्ष २०२० मध्ये इंग्लंड येथे ‘ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन’ या आस्थापनाने २ कोटी ५५ लाख रुपये किमतीला लिलावात विकला. गांधी यांनी लिहिलेल्या २ दुर्मिळ पत्रांची वर्ष २०१४ मध्ये ताज हॉटेलमध्ये अनुक्रमे ११ लाख ५ सहस्र आणि ९ लाख रुपये किमतीला विक्री झाली. अशा प्रकारे थोर व्यक्तींच्या वस्तूंचे मूल्य पैशांत मोजता येत नाही, तर तो अमूल्य ठेवा जतन करायचा असतो. देशाची संस्कृती आणि इतिहास यांचा अभिमान म्हणजे देशाचे खरे राष्ट्रीयत्व होय. देशाचा तेजस्वी इतिहासच भावी पिढीमध्ये राष्ट्रचेतना जागृत करतो. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसने या थोर राष्ट्रपुरुषांची अवहेलना केली. देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसने देशातील ४५० योजनांना गांधी आणि नेहरू यांची नावे दिली आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काँग्रेसने एकाही योजनेला लोकमान्य टिळक यांचे नाव दिले नाही. देहलीच्या महाराष्ट्र भवनामध्ये काँग्रेसने लोकमान्य टिळक यांचा पुतळाही उभारला नव्हता, यासाठी लोकमान्य टिळक यांच्या वारसदार आणि पुणे येथील तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांना त्यासाठी मागणी करावी लागली. महापुरुषांना जातीमध्ये विभागण्याचे काँग्रेसचे हे अक्षम्य पाप आहे. लोकमान्य असोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत, महात्मा गांधी असोत वा स्वातंत्र्यवीर सावरकर आदींना जातीयवादातून पहाणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्रकार्याचा अपमानच आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळी हे राष्ट्रकार्य भावी पिढीसमोर ठेवले जाईल, त्याच वेळी खर्या अर्थाने भारत बलशाली होईल !