आहाराविषयी आध्यात्मिक स्तरावरील सकारात्मकता ठरवणारे घटक लक्षात घ्या ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘स्वतःचा आहार आपल्या प्रभावळीवर कसा परिणाम करतो ?’, या विषयावरील संशोधन ऑस्ट्रिया येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क आहेत सहलेखक !
मुंबई – बहुतांश वेळा आपण आहाराची चव किंवा त्यातील पोषण मूल्ये या निकषांवर त्याची निवड करतो; परंतु ‘त्याचा स्वतःवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होणार’, याविषयी कुणीही विचार करत नाही; कारण ते आपल्याला कधीही शिकवलेले नाही. आहाराचे घटक सात्त्विक असणे, तसेच स्वयंपाक करणारी व्यक्ती, स्वयंपाक करण्याची प्रक्रिया आणि स्वयंपाकघराचे वातावरण यांचा जेवणाची सकारात्मकता किंवा नकारात्मकता यांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. त्यामुळे आहाराविषयी आध्यात्मिक स्तरावरील सकारात्मकता ठरवणारे घटक लक्षात घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते ‘सेकंड ग्लोबल समिट ऑन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन’, या व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. या परिषदेचे आयोजन ‘द पल्सस ग्रुप, यू.के.’ यांनी केले होते. श्री. क्लार्क यांनी ‘स्वतःचा आहार आपल्या प्रभावळीवर कसा परिणाम करतो ?’, हा शोधनिबंध ‘ऑनलाईन’ सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क सहलेखक आहेत.
१. श्री. क्लार्क पुढे म्हणाले, ‘‘आपला आहार आपल्या प्रभावळीवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतो. जेव्हा नकारात्मक परिणाम होतो, तेव्हा शारीरिक स्तरावर सुस्ती, तसेच विविध आजार निर्माण होतात. मानसिक स्तरावर आक्रमक वर्तन, उदासीनता, वैचारिक गोंधळ, निर्णयक्षमतेचा अभाव असे परिणाम दिसून येतात.’’ त्यानंतर श्री. क्लार्क यांनी ‘प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)) याच्या माध्यमातून शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ, त्याचे विविध कच्चे घटक, तसेच हे पदार्थ ग्रहण करणार्या व्यक्ती यांविषयी केलेल्या चाचण्यांविषयी विस्तृत माहिती दिली.
२. मांसाहारी पदार्थांच्या कोणत्याही घटकामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. त्यांच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मटनामध्ये १९४.६ मीटर, कोंबडीच्या मांसामध्ये (चिकनमध्ये) १८८.५ मीटर, बांगड्यात (माशाचा प्रकार) ३६.६ मीटर, तर अंड्यामध्ये ती १७ मीटर होती.
३. शाकाहारी पदार्थांच्या सर्व घटकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळण्यासह नकारात्मक ऊर्जाही होती; परंतु मांसाहारी पदार्थांच्या घटकांच्या तुलनेत अगदी अल्प प्रमाणात होती.
४. वरील पदार्थ ग्रहण करणार्या व्यक्तीच्या पदार्थ ग्रहण केल्यानंतर ५ मिनिटांनी घेतलेल्या चाचणीत तिची नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळले. विविध पदार्थ ग्रहण केल्यानंतर त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘चिकन फ्राय’मध्ये १३० मीटर, ‘फिश (मासे) फ्राय’मध्ये १२७ मीटर, ‘ऑमलेट’मध्ये ८८ मीटर, तर ‘मिक्स्ड व्हेजिटेबल’मध्ये ७३ मीटर होती.
संशोधनाचा निष्कर्षमहर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रातील स्वयंपाकघरात सेवा करणार्या महिला संतांनी बनवलेली फ्लॉवरची सुकी भाजी ग्रहण केल्यावर त्या व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही; परंतु त्याच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १७.३ मीटर एवढी आढळली. आहारविषयीच्या संशोधनातून स्पष्ट होते की, आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक आहार व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्याला हातभार लावतो. यासाठी स्वयंपाक करतांना, तसेच आहार ग्रहण करतांना नामजप करणे आवश्यक असते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ऑस्ट्रिया येथे झालेले हे ८२ वे सादरीकरण होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत १५ राष्ट्रीय आणि ६६ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. यांपैकी ९ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट पुरस्कार’ मिळाले आहेत. |