विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप
‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार मी काही विकारांवर जप बनवले. ‘कोरोना विषाणूं’ची बाधा दूर करण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावरून मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली. हे जप म्हणजे आवश्यक त्या वेगवेगळ्या देवतांचे एकत्रित जप आहेत. मी शोधलेले हे जप साधकांना त्यांच्या विकारांवर देत आहे. ‘त्या जपांचा त्यांना चांगला लाभ होत आहे’, असे त्यांनी सांगितल्यावर लक्षात आले. काही मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) काही विकार, त्यांवरील जप आणि साधकांनी तो जप केल्यावर त्यांना आलेल्या अनुभूती दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापल्या होत्या. आज आणखी काही विकार आणि त्यांवरील जप येथे दिले आहेत. हे नामजप गेल्या ३ मासांत काही साधकांना दिले आहेत. त्यांनी त्यांना आलेल्या अनुभूती लवकरात लवकर ग्रंथासाठी लिहून या लेखात दिलेल्या इ-मेल पत्त्यावर किंवा टपालाच्या पत्त्यावर पाठवाव्यात.
१. बाजूच्या सारणीत दिलेल्या विकारांपैकी काही विकारांच्या संदर्भात सांगितलेल्या जपांविषयी संत आणि साधक यांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव
१ अ. मूत्रवहन संस्थेमध्ये संसर्ग होणे : एका संतांच्या ‘प्रोस्टेट’ ग्रंथीला सूज यायची. त्यामुळे मूत्रवहन मार्गामध्ये अडथळा येऊन लघवी पूर्णतः न झाल्याने तेथे जंतूसंसर्ग व्हायचा आणि त्यांना वारंवार ताप यायचा. यावर औषधे घेऊनही परिणाम होत नव्हता. त्यांनी मी सांगितलेला या विकारावरील जप २ मास (महिने) प्रतिदिन १ घंटा (तास) केल्यावर त्यांचा तो आजार बर्याच प्रमाणात आटोक्यात आला. आताही दिलेला जप करणे थांबवल्यावर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागतो; म्हणून त्यांनी हा जप किमान अर्धा घंटा करणे चालू ठेवले आहे.
१ आ. शरिरात एखाद्या ठिकाणी दाह होणे : एका साधिकेची (वय ७९ वर्षे) पूर्वी ‘पाईल्स’ची शस्त्रक्रिया झालेली आहे. ऑक्टोबर मासामध्ये वातावरणातील उष्णता वाढत असल्याने शरिरातीलही उष्णता वाढते. त्यामुळे त्या मासामध्ये त्या साधिकेला शौचाला झाल्यानंतर गुदद्वारामध्ये दाह होतो. तो दाह थांबण्यासाठी मी त्यांना जप सांगितला. आता तो जप केल्यावर त्यांना १५ मिनिटांतच गुदद्वारामध्ये होणारा दाह थांबतो. पूर्वी हा दाह थांबायला ४५ मिनिटे ते दीड घंटा लागायचा.
१ इ. पचनशक्ती आणि आतड्यांची शक्ती न्यून असणे : एका संतांचे अन्नपचन व्यवस्थित होत नसल्याने त्यांचे पोट जड असायचे आणि त्यांना शौचाला साफ व्हायचे नाही. त्यामुळे ते बारीक झाले होते. त्यांनी या विकारावरील जप प्रतिदिन १ घंटा करणे आरंभ केल्यावर त्यांना १ मासामध्येच लाभ झाला. आता त्यांची पोटाची कुठलीही तक्रार नसल्याने त्यांनी तो जप करणे थांबवले आहे.
१ ई. करट (मोठा फोड) होणे : एका साधिकेला डाव्या काखेमध्ये करट झाले होते. त्याच्या त्यांना असह्य वेदना होत होत्या आणि त्या वेदनाशामक गोळी घेऊनही थांबत नव्हत्या. मी शोधलेला जप केल्यावर २ घंट्यांतच त्यांच्या काखेतील वेदना थांबल्या आणि त्यांना तो हात हलका वाटू लागला. त्यानंतर करट फोडून पू बाहेर काढतांनाही त्यांना विशेष वेदना झाल्या नाहीत. नंतर ते करट पूर्णपणे बरे झाले.
१ उ. डेंग्यू (प्लेटलेट्स न्यून होणे) : ‘डेंग्यू’ या विकारामध्ये रक्तातील ‘प्लेटलेट्स’ त्यांच्या सर्वसामान्य प्रमाणापेक्षा न्यून होतात. त्यांचे सर्वसामान्य व्यक्तीतील प्रमाण दीड लाख ते ४ लाख असते. एका साधकाला ‘डेंग्यू’ झाल्यावर त्यांच्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’चे प्रमाण ६० सहस्र झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. याविषयी त्यांनी मला सायंकाळी ६ वाजता कळवले. मी त्यांना ‘प्लेटलेट्स’ वाढण्यासाठी जप दिला आणि त्यांना तो अधिकाधिक वेळ करण्यास सांगितला. त्यानंतर दुसर्या दिवशी दुपारी १ वाजता जेव्हा त्यांच्या रक्ताची पुन्हा चाचणी करण्यात आली, तेव्हा त्यांच्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ १ लाख २० सहस्र झाल्या होत्या. जपामुळे केवळ अर्ध्या दिवसामध्ये ‘प्लेटलेट्स’ची आश्चर्यकारक वाढ झाली होती. असाच अनुभव एक साधिका आणि त्यांचा भाऊ यांना आला.
१ ऊ. मेंदूत गाठ झाल्याने भ्रमिष्ट होणे : एका साधिकेच्या वडिलांना (वय ७४ वर्षे) मेंदूत गाठ झाल्याने ते भ्रमिष्ट झाल्यासारखे झाले होते. त्यांच्यासाठी मी या विकारावरील जप सांगितला. तो जप त्या साधिकेची आई प्रतिदिन २ घंटे करत होती. या जपाचा इतका छान लाभ झाला की, तिच्या वडिलांना पाचव्या दिवशी पुष्कळ बरे वाटू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तेव्हा मेंदूचे ‘स्कॅनिंग’ केल्यावर मेंदूतील गाठ ३० – ४० टक्के विरघळली असल्याचे लक्षात आले. आणखी ८ दिवसांनी ती गाठ ६० टक्के विरघळली होती. आणखी १ मासाने ती गाठ केवळ १० टक्केच राहिली. त्या साधिकेचे वडील या वयात इतके बरे झाले होते. याविषयी तेथील डॉक्टरही आश्चर्यचकित झाले.
२. जपांचे महत्त्व
आपत्काळात औषधे, डॉक्टर यांची टंचाई भासेल, तेव्हा या जपांचा चांगला उपयोग होईल.
३. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मी हे जप शोधू शकलो आणि त्या जपांची चांगली परिणामकारकताही लक्षात आली. यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.१०.२०२१)
विकारासंदर्भात नामजप करून त्यासंदर्भातील अनुभूती पाठवा !साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा. या नामजपाच्या संदर्भात येणार्या अनुभूती साधकांनी sankalak.goa@gmail.com या ई-मेल पत्त्यावर किंवा पुढील टपालाच्या पत्त्यावर पाठवाव्यात. साधकांच्या या अनुभूती ग्रंथात घेण्याच्या दृष्टीने, तसेच नामजपाची योग्यता सिद्ध होण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरतील. टपालाचा पत्ता : सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१. |